Join us

अकरावी प्रवेशाची तयारी केव्हा सुरू होणार?; विभागीय उपसंचालकांना सूचना नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 8:26 AM

दहावीनंतर अकरावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी करण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी दहावीत असतानाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते.

मुंबई : दहावीनंतर अकरावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी करण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी दहावीत असतानाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष ही तयारी करताच आली नाही. यंदाही दहावीच्या परीक्षांना सुरुवात होऊनही अद्याप विभागीय मंडळांना अकरावी प्रवेश किंवा त्यासंबंधित कार्यशाळा घेण्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत.यामुळे गोंधळात वाढ झाली आहे. अकरावी प्रवेशाचे यंदा चौदावे वर्ष आहे. दरवर्षी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी व पालक असतात यामुळे प्रवेशातील माहिती व सराव होण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ खुले करू देण्यात येत होते. पण यंदा परीक्षा संपल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सुकर होण्यासाठी दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज सरावासाठी उपलब्ध केले जाणार आहेत का? असे प्रश्न आता पालकांकडून उपस्थित होत आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे अकरावी  ऑनलाइन प्रवेशाच्या बाबतीत लवकरच विभागीय उपसंचालक कार्यालयांना सूचना देण्यात येणार आहेत. - महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण संचालनालय