Join us

‘जेजे’वरील ‘कैदी वॉर्ड’चा ताण कधी कमी होणार? गुन्हेगार, आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचाही भार

By संतोष आंधळे | Published: October 24, 2024 12:27 PM

जेजे रुग्णालयात स्वतंत्र ‘कैदी वॉर्ड’ आहे. महिन्याला १५० - २०० रुग्ण ओपीडीत येतात.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, आर्थर रोड आणि भायखळा येथील तुरुंगातील कैद्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात येते. परिणामी या रुग्णालयात ‘कैदी उपचारा’चा ताण  वाढत आहे. त्यामुळे कैद्यांना केईएम, सायन, कूपर, नायर आणि ठाणे येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यास जेजेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मत वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

जेजे रुग्णालयात स्वतंत्र ‘कैदी वॉर्ड’ आहे. महिन्याला १५० - २०० रुग्ण ओपीडीत येतात. त्यातील रुग्णांना  कैदी वॉर्डात दाखल केले जाते.  सीबीआय, ईडी, सीआयडी आणि एसीबी या तपास यंत्रणा आरोपींना तपासणीसाठीही याच रुग्णालयात आणतात. आरोपींना कोर्टात सादर करण्यापूर्वी येथेच वैद्यकीय तपासणीसाठी आणले जाते. शरीरातून तस्करी करणाऱ्या  आरोपींची तपासणीही याच रुग्णालयात करण्यात येते.

महापालिका रुग्णालयेही सक्षम

जेजे रुग्णालयाप्रमाणेच महापालिका रुग्णालयेही कैद्यांना उपचार देण्यासाठी सक्षम आहेत. किंबहुना त्यांच्याकडे जेजे रुग्णालयापेक्षा अधिक यंत्रणा असून त्या  ठिकाणी गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, हिमॅटॉलॉजी, एंडोक्रायनोलॉजी असे अत्याधुनिक विभागही आहेत. हे जेजे रुग्णालयात विभाग नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो संपर्क होऊ शकला नाही.

पालिका रुग्णालयात ‘कैदी वॉर्ड’ कधी?

मुंबईतील महापालिकेच्या एका मुख्य रुग्णालयात ‘कैदी वॉर्ड’ निर्माण करण्यात यावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. २०१६ पासून  या रुग्णालयात असा स्वतंत्र ‘कैदी वॉर्ड’ व्हावा म्हणून तत्कालीन आयुक्त, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या रुग्णालयात कैदी तपासणी सुरू झाल्यास जेजेवरील ताण कमी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जे जे या राज्य सरकारच्या रुग्णालयावर आधीच रुग्णसेवेचा मोठा ताण आहे. आधुनिक सेवा-सुविधांनी सज्ज असलेल्या दक्षिण मुंबईतील या रुग्णालयात राज्यभरातून अनेक आजारांचे शेकडो रुग्ण येतात. अनेक गंभीर आजारातून आपण किंवा आपला रुग्ण बरा होईल, अशा आशेने ते येतात. 

टॅग्स :जे. जे. रुग्णालयडॉक्टर