मुंबई : वसई-विरारमधील रहिवाशांची पाण्याची वाढती तहान भागवण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून सूर्या प्रकल्पाचे पाणी या शहरांना पोहोचवले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला मुहूर्तच मिळेनासा झाल्याने आमची तहान भागणार कधी, असा प्रश्न वसई विरारकरांना पडला आहे.
एमएमआरडीएने हाती घेतलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला. सूर्या प्रकल्पांतर्गत मीरारोड भाईंदरला दररोज २१८ दशलक्ष लिटर, तर वसई विरारला दररोज १८५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएने १३२५.७८ कोटी रुपये खर्च करून सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून हाती घेतले. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प रखडला. आता या प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची उत्सुकता आहे. निवडणूक जवळ आल्याने हा प्रकल्प मार्गी लागत असल्याची चर्चा आहे.
या प्रकल्पातील वसई विरारसाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वसई विभागामधील तुंगारेश्वर येथील ४.४५ किमी लांबीच्या बोगद्याचे ४ किमी अंतराचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
यामुळे मीरा-भाईंदरला देखील पाणी मिळणार आहे.
लवकरच उद्घाटन
वसई विरारची तहान भागविणारा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्याचे लोकार्पण जूनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मात्र अद्यापही त्याचे लोकार्पण झालेले नाही. लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिली.