Join us  

वाहतूककोंडीची कटकट संपणार तरी कधी? मुंबईतील कलावंतांचा जळजळीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 6:26 AM

वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाला कंटाळलेल्या काही सेलिब्रिटींनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोठे रस्ते, नवनवीन पूल, भुयारी मार्ग झाले, तरीही मुंबईकरांच्या पाचवीला पूजलेली वाहतूककोंडी सुटलेली नाही. सर्वसामान्यांप्रमाणे मनोरंजन विश्वातील तारे-तारकांनाही याचा फटका बसतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेने वाहतूककोंडीबाबत होणारा मन:स्ताप व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. इतर कलाकारही यातून सुटलेले नाहीत.

मीरा रोड आणि ठाणेच्यामध्ये वाहतूककोंडीत अडकलेल्या सुबोधने एक व्हिडीओ शेअर करत खडेबोल सुनावले होते. व्हिडीओत तो म्हणाला होता की, रस्त्यांतील खड्डे, विरुद्ध दिशेने येणारी वाहने आणि वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे सिग्नलचे काम आपल्याकडूनच करून घेतले जात आहे. ही दूरदृष्टी आपल्या देशातच आहे. वाहतूककोंडीमुळे सिग्नलचा आणि खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकरचा खर्च वाचवण्याची ही केवढी वेगळी दृष्टी आहे. लोकांचा वेळ आणि जीव भारतात तसा महत्त्वाचा नाही. लोकांप्रमाणे मीसुद्धा गाडी इथेच पार्क करून चालत सेटवर जाण्याचा विचार करत असल्याचेही सुबोध व्हिडीओत म्हणाला. वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाला कंटाळलेल्या काही सेलिब्रिटींनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅक्स भरतो मग असे का? - प्रार्थना बेहरे

ट्रॅफिक जामचा खूप त्रास होतो. त्यामुळे वर्षभरापूर्वी अलिबागला शिफ्ट झाले आहे. अलिबागहून रोरोने मुंबईत पोहोचायला ४५ मिनिटे लागतात, पण बांद्र्याहून अंधेरीला पोहोचायला एक तास लागतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर मी मोबाइलवर बोलून होणारी कामे करते, पण समोरच्या व्यक्तीला दिलेली वेळ कित्येकदा पाळता येत नाही. यासाठी मी घरून लवकर निघते. पाच मिनिटांच्या ट्रॅफिकला अर्धा तास लागणार हे गृहित धरलेले असते. टॅक्स भरूनही वाट्याला हे भोग येत असल्याचे खूप वाईट वाटते. इतर देशांमध्ये ही समस्या नाही, मग आपल्याकडे कुठे पाणी मुरते ते समजत नाही.

फुगा फुटायला आला आहे - महेश मांजरेकर

वाहतूककोंडीसाठी मी फुग्याचे उदाहरण देईन. तुम्हाला एखादा फुगा फुगवायला सांगितला आणि त्यात तुम्ही त्याच्या क्षमतेपेक्षा आठ पट जास्त हवा भरली, तर तो फुटणारच ना... मुंबईरूपी फुगा आता फुटण्याच्या पॉइंटवर आहे. मुंबईला येण्यापासून कोणाला थांबवू नका, असे काही जण म्हणतात. मुंबईत सर्व जाती-धर्मांचे लोक राहतात. आज त्यांना विचारले, तरी तेही म्हणतील की, आता लोंढे थांबवा. जोपर्यंत तुम्ही इतर शहरांत रोजगार देणार नाही, तोपर्यंत मुंबईचा वाहतूक प्रश्न सुटणार नाही. 

कार सोडून बाइकने पोहोचतो : संतोष पवार

पूर्वी आम्ही दिवसाला नाटकाचे तीन प्रयोग करायचो, पण आता दोन प्रयोग करणेही कठीण झाले आहे. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटकाच्या दोन प्रयोगांसाठी दोन वेगवेगळे सेट तयार केले आहेत. एक प्रयोग संपला की, दुसऱ्या प्रयोगासाठी मी मित्राच्या बाइकवरून पोहोचतो. वैभव मांगलेही बाइकनेच प्रवास करतो. रेल्वेमध्ये गर्दी असते त्यामुळे प्रवास केल्यास एनर्जीच उरत नाही. प्रयोगाला वेळेत पोहोचू की नाही, याची धाकधूक असते. यावर लोंढे आवरणे हाच पर्याय आहे. छोट्या शहरांमध्ये रोजगार उपलब्ध केल्यास लोंढ्यांना आळा बसेल.

वेळ, पैसे वाया जातात - विशाखा सुभेदार

वाहतूक कोंडीमुळे खोळंबा होतो. शूटिंगचा कॉल टाइम साडेआठचा असल्यास प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर घरातून निघते. वेळेत पोहोचता आले नाही, तर रात्री उशिरा पॅकअप होते. निर्मात्यांपासून सर्वांनाच याचा भुर्दंड बसतो. काही वेळेला नाटकाचा प्रयोग उशिरा सुरू होतो. नाटक उशिरा सुरू झाल्यावर नाट्यगृहाचे हजार-दीड हजार रुपये भाडे वाढते. ‘टाइम इज मनी’ म्हटले जाते, पण वाहतूककोंडीमुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातात. खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान होते. घोडबंदरचा रस्ता अतिशय घाणेरडा आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडीमहेश मांजरेकर मुंबई