Join us

सर्वांसाठी रेल्वे कधी सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे लवकरच सुरू होणार आहेत. राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे लवकरच सुरू होणार आहेत. राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटना विचारत आहेत.

कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या चार महिन्यांपासून लोकल बंद होती. १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील बहुतांश नोकरदार आहे. ४५ ते ६० वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे, तर ६० हून अधिक वयाचे प्रवासी आता प्रवास करणे टाळत आहेत. तिकीट मिळत नसून फक्त पास दिला जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. जर महिन्यातून दोन वेळा जायचे तर महिन्याचा पास का काढायचा हा प्रश्न आहे. तसेच बहुतांश कामगार १८ ते ४४ वयोगटातील असल्याने त्यांना जूनमध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यांपैकी काहीजणांचे दोन डोस अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी सुद्धा लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेल्या गटाला रेल्वे प्रवासाची मुभा आहे. राज्य सरकारने सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्यास सांगितले तर त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

---

कोट

सण, उत्सव सुरू आहेत, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. लोकलने प्रवास करण्यास मुभा नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या नावाखाली सरकार सामान्यांच्या असहायतेचा फायदा घेत आहे. रेल्वेसेवा पूर्ववत करावी.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था