मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. त्यामुळे आता उत्तरपत्रिकांची तपासणी विद्यापीठ कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.निकालाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, निकाल जाहीर करता येतो, पण इथे अद्याप उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होत नसल्याने, उर्वरित निकाल विद्यापीठ कधी जाहीर करणार? याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात झाल्या. परीक्षा संपून तीन महिने संपूनही निकाल न लागल्याने, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.मुंबई विद्यापीठाचा सर्व कारभार सध्या प्रभारी व्यक्तींच्या खांद्यावर आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख सुट्टीवर आहेत. कुलगुरू देशमुख यांनीच आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला होता. ही पद्धत सपशेल नापास झाली आहे. स्कॅनिंगमध्ये झालेल्या गोंधळामुळे निकाल लागण्यास उशीर होत आहे, तसेच लागलेल्या निकालामध्येही गोंधळ दिसून येत आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी संपणार कधी? विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:18 AM