मुंबई : मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. हिवाळी परीक्षा सुरू होणार असल्या, तरी आधीच्या सत्राच्या परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाने सर्व ४७७ निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली, पण अजूनही मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाच्या २५ विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली नाही.मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात आली. नवीन पद्धतीत असलेल्या त्रुटींचा आधीच विचार न झाल्याने निकालाला लेटमार्क लागला. उत्तरपत्रिका स्कॅनिंगमध्ये मे महिना लोटल्यामुळे तपासणी करण्यासाठी प्राध्यापकांना उशीर झाला. या सगळ्या गोंधळाचा फटका मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना बसला आहे. या सर्व गोंधळात राज्यशास्त्र विभागातर्फे चालविल्या जाणाºया मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचा निकाल लागायचा राहून गेल्याचे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलन करणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.गेल्या ५ महिन्यांपासून सुमारे २० ते २५ विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत. मुंबई विद्यापीठाने ‘मानवी हक्क पदविका’ अभ्यासक्रमाचे निकाल रखडून ठेवणे म्हणजे, विद्यार्थ्यांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप छात्रभारतीचे मुंबई विद्यापीठ संघटक रोहित ढाले यांनी केला आहे. विद्यापीठाच्या कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असून, ९ नोव्हेंबरच्या आंदोलनापासून याची सुरुवात होईल, असेही ढाले यांनी स्पष्ट केले.28000 विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर होणे बाकी आहेत. त्याचबरोबर ९० हून अधिक राखीव विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. पण विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.कारण, निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. २८ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल बाकी असून येत्या दोन ते तीन दिवसांत हे निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्राध्यापकांची मदत घेण्यात येत असल्याचे या प्रकरणी बोलताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.घाटुळे यांनी पुढे सांगितले की, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अद्याप हॉल तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांची ही तक्रार मुंबई विद्यापीठाने मान्य केली नाही. टीवायबीए आणि बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचे वाटप करण्यात आलेले असून संकेतस्थळावर ही हॉलतिकीट उपलब्ध आहेत, अशी माहिती विद्यापीठाने दिली.मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे पुनर्मूल्यांकनाचा टक्का वाढला आहे. विद्यापीठाच्या हिवाळी आणि केटी परीक्षा दोन दिवसांत सुरू होणार असल्या तरी अद्याप सुमारे २८ हजारांहून अधिक पुनर्मूल्यांकनाचे आणि ९० राखीव निकाल जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. पण विद्यापीठाने पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.एटीकेटी परीक्षेचा ताण वाढलाहजारो विद्यार्थी आजही पुनर्मूल्यांकनाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण वाढला आहे. निकाल हाती नसल्याने एटीकेटीची परीक्षा द्यायची की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून परीक्षेचा ताण वाढला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश चुकले आहेत, तर आता दुसरीकडे निकाल हातात न आल्याने परीक्षा द्यायच्या की नाही, याविषयी विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायम आहे.
निकालाची प्रतीक्षा संपणार कधी? , मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचे निकाल रखडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:03 AM