आमचे हक्क कधी मिळणार?

By admin | Published: June 23, 2016 03:51 AM2016-06-23T03:51:19+5:302016-06-23T03:51:19+5:30

उपेक्षित जीवन जगताना आपल्याला मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वांद्रे टर्मिनस येथे नुकतेच तृतीयपंथीयांनी आंदोलन केले. सुमारे ३00 तृतीयपंथी या आंदोलनात सहभागी झाले होते.

When will we get our rights? | आमचे हक्क कधी मिळणार?

आमचे हक्क कधी मिळणार?

Next

मुंबई : उपेक्षित जीवन जगताना आपल्याला मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वांद्रे टर्मिनस येथे नुकतेच तृतीयपंथीयांनी आंदोलन केले. सुमारे ३00 तृतीयपंथी या आंदोलनात सहभागी झाले होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारा हा समाज जीवन जगत आहे. एका दहा बाय दहाच्या खोलीत १५ ते २0 तृतीयपंथी रहात असून कोणत्याही रोजगाराच्या संधी नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव भीक मागून उदरनिर्वाह करावा लागत आहे, असे मत किन्नर माँ एक सामाजिक संस्थाच्या अध्यक्ष सलमा खान यांनी यावेळी व्यक्त केले.
या संस्थेच्या सदस्या अविशा एक उच्चशिक्षित तृतीयपंथी आहेत. समाज आम्हाला तुच्छतेने पाहात असल्यामुळे आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. घाणीत वास्तव्य करावे लागत असल्यामुळे या समाजात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रमाणात एचआयव्हीची लागणही काही यांच्यात दिसून येत आहे. तसेच नैराश्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढीस लागली असून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तृतीयपंथी समाजाच्या आरोग्यासाठी तसेच त्यांच्यातील व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून नशाबंदी मंडळ यासाठी पुढाकार घेईल, असे मत सामाजिक कार्यकर्त्या आणि नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केले.
समाजातील एक भाग असलेला आमचा तृतीयपंथी समाजाला पूर्णपणे सरकारने पोरके केले आहे. आम्हाला अन्यायाची वागणूक मिळत आहे. खासदार असलेल्या हेमामालिनी यांना सरकार त्वरीत भूखंड उपलब्ध करून देते. परंतु आम्ही गेली पाच वर्षापासून आमच्या आश्रमासाठी सरकारकडे जागा मागतो आहोत त्याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे, हेच आहेत का अच्छे दिन, असे वयोवृद्ध असलेल्या महाराणी शफिक खान म्हणाल्या.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथी समाजासाठीही तरतूद असायला हवी, या मागणीसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात आझाद मैदानात आंदोलन उभे करण्यात येईल. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तृतीयपंथीयांना इतर मागास प्रवर्गाचा दर्जा व मताचा अधिकारही देण्यात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणूकीत एक तरी तृतीयपंथी महापालिका सभागृहात निवडून जावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रजासत्ताक भारत संघटनेचे अध्यक्ष अमोल स.भा. मडामे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: When will we get our rights?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.