आम्हाला लसींचा साठा केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:53+5:302021-05-05T04:09:53+5:30
खासगी रुग्णालयांचा सवाल आम्हाला लसींचा साठा केव्हा मिळणार? खासगी रुग्णालयांचा सवाल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुरेसा साठा नसल्यामुळे ...
खासगी रुग्णालयांचा सवाल
आम्हाला लसींचा साठा केव्हा मिळणार?
खासगी रुग्णालयांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुरेसा साठा नसल्यामुळे राज्यासह मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यात सध्या केवळ पालिका, शासकीय आणि जिल्हा रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. लसीच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांना साठा देणे बंद केल्याने आता पुन्हा नवा लसीचा साठा कधी मिळणार, या प्रतीक्षेत खासगी रुग्णालय व्यवस्थापन असून याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
३० एप्रिल ते ३ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झाल्यानंतर आता मंगळवारी शहर, उपनगरातील ठरावीक लसीकरण केंद्रांवर ४५ हून अधिक वय असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत डोस आणि लसीकरण केंद्र कमी असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
याविषयी खासगी रुग्णालयांतील लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले, तीन दिवसांपूर्वी लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण होणार नसल्याचे पालिकेने कळविले. त्यानंतर पालिका खासगी रुग्णालयांना लस पुरवेल, असेही सांगण्यात आले. मात्र, आता ३-४ दिवस उलटल्यानंतर याविषयी पालिकेकडून काही अधिकृत कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.
हिंदुजा रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जॅय चक्रबर्ती यांनी सांगितले, लसीचा नवा साठा येण्याची वाट पाहत आहोत. पालिकेने नव्या लसींच्या साठ्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
* पालिकेकडून साठा मिळणार नाही : काकाणी
पालिकेकडून खासगी लसीकरण केंद्रांना लसींचा साठा देण्यात येणार नाही. खासगी रुग्णालय व्यवस्थापन स्वतः लसींचासाठा खरेदी करू शकतात आणि लसीकरण मोहीम चालवू शकतात. केंद्र शासनाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस घेण्याची संमती असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
.........................................