महिला पोलीस मदतीची याचना करते तेव्हा...
By admin | Published: July 3, 2015 03:16 AM2015-07-03T03:16:38+5:302015-07-03T03:16:38+5:30
जनतेची सेवा करण्यासाठी पोलीस बनलो. माणुसकीच्या भावनेतून पोलीस अनेकदा इतरांना मदत करतात. मात्र मुंबईकरांच्या मनातील पोलिसांबद्दलची भावना संपल्याची जाणीव मला झाली,
मनीषा म्हात्रे ,मुंबई
जनतेची सेवा करण्यासाठी पोलीस बनलो. माणुसकीच्या भावनेतून पोलीस अनेकदा इतरांना मदत करतात. मात्र मुंबईकरांच्या मनातील पोलिसांबद्दलची भावना संपल्याची जाणीव मला झाली, अशी खंत गोवंडी-मानखुर्द दरम्यान लोकलमध्ये अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदार हर्षा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ड्युटीवर वेळेत पोहोचण्याची घाई आणि त्यात लोकल उशिरा धावत होत्या. नेहमीप्रमाणे मी सीएसटी लोकलसाठी मानखुर्द स्थानकावर आली. पण ६.३८ची लोकल ६.४५च्या सुमारास आली. कशीबशी शेवटच्या महिला डब्यात इतरांप्रमाणे मीही प्रवेश केला. कुर्ला स्थानकात उतरायचे असल्याने मी लोकलच्या दरवाजातच उभे होते. लोकल गोवंडी स्थानकात पोहोचत असतानाच बाहेरून एकाने मला लोखंडी रॉड मारून फेकला. त्या हल्ल्यात मी पूर्ण बधिर झाले होते. त्यात बाजूने जाणाऱ्या पनवेल लोकलवर मी कोसळणार तोच कोणीतरी मला आत ओढले.
लोकल थांबवण्यासाठी चेनही खेचण्यात आली. मात्र लोकल काही थांबली नाही. त्यानंतर काय झाले मला काहीच कळलेच नाही. जाग आली, तेव्हा मी रक्ताळलेल्या अवस्थेत गोवंडी स्थानकावर होते. वेदनेने मी विव्हळत होते. ‘कोणी तरी या मला मदत करा... अहो प्लिज मला रुग्णालयात न्या.. मला खूप त्रास होत आहे.’ अशी याचना मी जमलेल्यांकडे करत होती. मात्र जमलेल्यांपैकी कोणीही पुढे आले नाही. पोलिसी कपडे अंगावर होते. मात्र माझ्या यातनेची कोणीही दखल घेतली नाही. प्रत्येक जण आपल्या मोबाइलमध्ये माझे व्हिडीओ काढण्यात आणि फोटो घेण्यात धन्यता मानत होते. जणू मुंबईकरांमधील माणुसकीच संपली की काय? असे मला वाटले. फक्त बाजूला असलेली एक १५वर्षीय मुलगी मला धीर देत होती.
काही वेळाने रेल्वेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर त्यांच्या मदतीने मला राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही स्वत:च्या जिवाची पर्वा करत नाही. मात्र जेव्हा आमच्यावर ही परिस्थिती ओढावली तेव्हा कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही, याचे दु:ख आहे.
भावनाशून्य वागणूक
-२३वर्षीय हर्षा मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे पतीसोबत राहण्यास आहे. जनतेच्या सेवेसाठी १४ मे २०११ रोजी ती पोलीस सेवेत भरती झाली.
-चारकोपमध्ये पोलीस शिपाई म्हणून सेवा बजावल्यानंतर १० मार्च २०१५ पासून ती भांडुप पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.
-सेवेला सुरुवात केली असतानाच मुंबईकरांच्या भावनाशून्य वागणूकीची तिला प्रथमच प्रचिती आली. या अपघातात हर्षाच्या चेहऱ्यावर १६ टाके पडले आहेत. त्यात जबड्याला मार बसून तिचे चार दातदेखील तुटले आहेत.