यमराज वाहतुकीचे धडे देतात तेव्हा़..

By admin | Published: April 6, 2015 04:43 AM2015-04-06T04:43:23+5:302015-04-06T04:43:23+5:30

दहावीत असताना जवळचा मित्र दगावला. १० दिवसांपूर्वी अपघातात दुसरा मित्रही गमावला, असा प्रसंग अन्य कुणावर ओढवू नये म्हणून पेशाने छायाचित्रकार असलेल्या तरुणाने

When yamraj gives lessons in transport .. | यमराज वाहतुकीचे धडे देतात तेव्हा़..

यमराज वाहतुकीचे धडे देतात तेव्हा़..

Next

मनीषा म्हात्रे, मुंबई
दहावीत असताना जवळचा मित्र दगावला. १० दिवसांपूर्वी अपघातात दुसरा मित्रही गमावला, असा प्रसंग अन्य कुणावर ओढवू नये म्हणून पेशाने छायाचित्रकार असलेल्या तरुणाने स्वत: यमाचा अवतार घेतला. पुराणातला यमराज माणसाचे जीव घेण्यासाठी अवतरतो, अशी दंतकथा सांगितली जाते. परंतु २१व्या शतकातील हा प्रतीकात्मक यमराज अवतरला तो लोकांचे जीव वाचवण्यासाठी. या यमराजाने एका हातात रेडा तर दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन वाहनचालकांना वाहतुकीचे नियम न मोडण्याचे आवाहन केले.
मूळचा भांडुपचा रहिवासी असलेला शशी राणे हा ३५ वर्षीय तरुण सध्या ऐरोलीमध्ये कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. दहावीत असताना बालमित्र सुधीर कदमचा अपघातात मृत्यू झाला. याचा परिणाम त्याच्या बालमनावर झाला. त्या वेळी काय करायचे हे त्याला सुचले नाही, यातून तो कसबसा सावरलाही. त्याला सावरण्यासाठी मित्र प्रणम सावंत आधार ठरला. १० दिवसांपूर्वी आधार देणारा सावंतही दुचाकी अपघातात गमावल्याने शशी फारच खचून गेला. मात्र यावर दु:ख करण्यापेक्षा अशा अपघातात आणखीन कोणी बळी पडू नये, म्हणून जनजागृती करण्याचा मार्ग अवलंबला. सुरुवातीला नागरिकांना थांबवून वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगणे उचित ठरणार नाही, म्हणून मरण समोर आले की सर्वांना यम डोळ्यांसमोर येतो, म्हणून स्वत: यमराजाच्या वेशभूषेत हा तरुण नागरिकांंच्या भेटीला अवतरला. भांडुपच्या रस्त्यांवर शनिवारी दुपारच्या सुमारास या यमराजांची एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला वाहने हळू चालवा, वाहतूक नियमांंचे पालन करा, हेल्मेट वापरा, असे अनेक संदेश या वेळी देण्यात आले.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत अपघातात मृत पावलेल्यांमध्ये तरुणवर्गाचे प्रमाण जास्त आहे. तरुणाईच्या आवेगात वेगाची नशा चढलेली ही मंडळी यामध्ये नाहक बळी पडत आहे. यासाठी त्यांचा जीव कुटुंबीयांसमवेत समाजासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सांगण्याचा यातून प्रयत्न करीत असल्याचे राणे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यातून काही जीव तरी वाचावे, यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न असल्याचे राणे याचे म्हणणे आहे.

Web Title: When yamraj gives lessons in transport ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.