मेरिट ट्रॅक कंपनीवर कारवाई कधी?, कारवाई कुणाकुणावर होणार याकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:20 AM2017-10-26T06:20:38+5:302017-10-26T06:20:41+5:30
मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठ निकाल लावण्यात अपयशी ठरल्यामुळे, राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले
मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठ निकाल लावण्यात अपयशी ठरल्यामुळे, राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले, पण फक्त कुलगुरूंवर कारवाई होणार की, परीक्षा विभागाचे अधिकारी आणि मेरिट ट्रॅक कंपनीवरही कारवाई होणार, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे, तसेच कुलगुरूंच्या कारवाईनंतर आता पुढे काय होणार? कोणावर कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळ विद्यापीठाला भोवला आहे. या गोंधळाची चौकशी करण्याचे अधिकार हे विद्यापीठाकडेच ठेवण्यात आले आहेत, तसेच विद्यापीठाच्या नोव्हेंबर महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्यावर काही अधिकाºयांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या मुंबई विद्यापीठ आॅक्टोबर महिना उजाडूनही हजारो विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरले आहे. या गोंधळामुळे देशमुख यांना पदावरून काढून टाकले.
विद्यापीठ कायद्यानुसार, देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देताना, देशमुख यांनी परीक्षा विभागावर या गोंधळाचे खापर फोडले होते. देशमुख यांना पदावरून काढून टाकल्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. मेरिट ट्रॅक कंपनीवर कारवाई होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यार्थी संघटना कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. स्टुडंट लॉ कौन्सिलने राज्यपालांना मेल केला आहे. यात मेरिट ट्रॅक कंपनीने ३ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने, कंपनीवर कारवाईची तसेच देशमुख यांनी केलेल्या नेमणुका रद्द करण्याचीही मागणी केल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.
बुधवारी दिवसभर विद्यापीठात पुढे कोणावर कारवाई होऊ शकते, याविषयी चर्चा ऐकायला मिळाली. मेरिट ट्रॅक कंपनीवर अनेकांनी ताशेरे ओढले आहेत, पण हिवाळी परीक्षांनंतर कंपनीचा खरा निकाल लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळी सुट्टी संपल्यावर विद्यापीठात सुरू होणाºया परीक्षांमध्ये गोेंधळ होऊ नये, म्हणून सध्या कोणावरही कारवाई होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर, विद्यापीठाच्या स्तरावर कारवाई सुरू होणार असून, अहवाल हा सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
।देशमुखांनी कुलगुरुंचा बंगला सोडला
डॉ. संजय देशमुख यांना आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणी पद्धतीत गोंधळ झाल्यामुळे मंगळवारी कुलगुरु पदावरुन बडतर्फ करण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास देशमुख यांनी कुलगुरुंचा बंगला सोडला. आता कुलगुरु पुन्हा मूळ लाइफ सायन्स विभागात प्राध्यापक पदावर रुजू झाले आहेत.