लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पालिकेकडून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून, ते वापरायोग्य बनविले जाते. त्यातील जवळपास साडेतीन दशलक्ष लिटर पाणी नौदलास पुरविण्यात येत आहे. याचप्रमाणे उर्वरित पाण्याचाही वापर कुठे आणि कसा करता येईल, याची चाचपणी पालिकेकडून सुरू आहे. प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, मैदाने, शौचालये किंवा बस धुण्यासाठी वापरले तर त्याचा योग्य वापर होईल. तसेच इतर पाण्याची बचत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
हवामानातील बदलांचा पावसावरही परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरात आणता यावे, यासाठी पालिकेकडून विविध सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू आहेत.
कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया होऊन ते पाणी समुद्रात सोडले जाते. प्रक्रिया केलेले हे पाणी ‘मरिन ऑउट फॉल’द्वारे समुद्रात सुमारे १.१५ किलोमीटर अंतरावर सोडले जाते. मात्र हे प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रात सोडण्याऐवजी विविध आस्थापनांना पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी दिल्यास दैनंदिन वापरात होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात बचत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याच कारणास्तव विविध आस्थापनांशी चर्चा करून कोणाला हे पाणी देता येईल, याची चाचपणी पालिका करत असल्याची माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.