सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: लोकसभा निवडणुकीत प्रत्येक सुजाण नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जनजागृती केली जात असतानाच पुरुष, महिला मतदारांसह तृतीयपंथींना मतदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यानुसार, मतदारसंघनिहाय तृतीयपंथी मतदारांचा आढावा घेण्यात आला आहे. मालाड पश्चिम येथे सर्वाधिक म्हणजे ३३९ तृतीयपंथी मतदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तृतीयपंथी आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहेत.
मुंबईतील टॉप १० विधानसभेतील तृतीयपंथी मतदारविधानसभा मतदारमालाड पश्चिम ३३९घाटकोपर पश्चिम १२०सायन कोळीवाडा ७६ माहीम ६५ दहिसर ४५ मानखुर्द ३९ धारावी ३७ भांडुप पश्चिम ३२ अणुशक्तीनगर ३१ दिंडोशी २६
मतदानाचा अधिकार आम्ही नक्की बजावणार आहोत. तृतीयपंथींसाठी धोरण हवे. जशा सगळ्यांना सेवा सुविधा मिळतात, तशा तृतीयपंथींना मिळाल्या पाहिजेत. त्यांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. सरकारने आमच्याकरता शेल्टर होम दिले पाहिजेत. आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे. असे झाले तर मतदान केल्याचा आनंद होईल. - डॉ. सलमा साकरकर, संचालिका, किन्नर माँ ट्रस्ट