Join us

तेव्हा ओबीसी नेते कुठे असतात?: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:01 IST

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  निवडणुका आल्या की ओबीसी नेते मिरवताना दिसतात; ओबीसींवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा हेच ओबीसी नेते कुठे गायब होतात? असा सवाल वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. 

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये कैलास बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे हे स्वतःला ओबीसींचे नेतृत्व करणारे म्हणवतात. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होत असताना हे कुठे असतात? जालना येथील या गंभीर घटनेकडे या नेत्यांनी गांभीर्याने पाहिलेले नसून,  ही बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

६ तारखेला मोर्चा 

जालना जिल्ह्यातील ओबीसी संघटनांशी चर्चा झाली असून, त्यांनी ६ मार्च रोजी मोर्चा आयोजित केला आहे. शासनाने तातडीने दोषींना अटक करावी, तसेच गावकऱ्यांनी ही अमानुष घटना उघड्या डोळ्यांनी पाहिल्याचा आरोप करीत संबंधित गावावर सामूहिक दंड बसवावा, अशी मागणीही ॲड. आंबेडकर यांनी केली आहे. दोषींवर तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.   

टॅग्स :प्रकाश आंबेडकर