Join us

मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात चिमण्या कुठे हरविल्या? कुणी सांगाल का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 10:16 AM

मांडणी शिल्पातून पालिका देतेय संवर्धनाची माहिती, महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने प्रमोद माने यांच्या स्पॅरो शेल्टर संस्थेमार्फत पर्यावरण पूरक असे चिमणीचे शिल्प बनविण्यात आले आहे.

मुंबई - मुंबईत सिमेंटचे जंगल दिवसेंदिवस वाढत असतानाच येथील चिमण्यांची संख्या मात्र हळूहळू कमी होत चालली आहे. चिमण्यांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी स्पॅरो शेल्टर व इतर सामाजिक संस्थाकडून प्रयत्न सुरू आहेत. पालिकेनेही यात हातभार लावला असून चिमणी संवर्धनाची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी स्पॅरो शेल्टर संस्थेमार्फत पर्यावरण पूरक असे चिमणीचे शिल्प साकारण्यात आले आहे. चिमण्यांची संख्या कमी का झाली, संख्या कमी होण्याची कारणे संख्या वाढवण्यासाठी उपाययोजना कोणत्या याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्ष संवर्धन व जैव विविधतेचे जतन करण्यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात येतात. वृक्ष संजीवनी योजना व इतर अनेक उपक्रम यापूर्वी पालिकेने राबवल्या आहेत. दरम्यान, जागतिक चिमणी दिनाच्यानिमित्तानेही सामाजिक संस्था चिमण्या वाचविण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. उन्हाळ्यात पाणी देण्यासाठीही या संस्था पुढाकार घेत असतात.

चिमण्यांची संख्या कमी होण्याची कारणे व त्यावरील उपययोजनांबाबत माहिती देण्यात आली आहे. उन्हाळयाच्या सुट्टीनिमित्त मुंबईतील काही निवडक उद्यानांमध्ये पर्यटकांची वर्दळ असते अशा उद्यानांमध्ये हे शिल्प पर्यटकांसाठी ठेवण्यात येणार आहे. याची सुरूवात दादरच्या नारळी बाग येथून करण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये चिमण्यांविषयीची जिज्ञासा जागृत करण्याच्या हेतूने हे शिल्प ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.