मुंबई : काँग्रेसच्या काळात २४ रुपयांची डाळ ५५ रुपयांवर गेली तेव्हा ही भीषण महागाई असल्याचे सांगत हेमा मालिनी आदी भाजपाच्या गॉगलवाल्या नेत्यांनी संसदेबाहेर आंदोलन केले. आता भाजपाच्या राज्यात डाळींनी २०० रुपयांचा भाव ओलांडला तरी भाजपा नेते, खासदार चकार शब्द काढायला तयार नाहीत, असा टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला. डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी-लाटणे मोर्चाचे आयोजन केले, यावेळी निरुपम बोलत होते. ऐन सणासुदीच्या दिवसात जीवनाश्यक वस्तूंच्या महागाईने सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. जी महागाई काँग्रेसच्या राज्यात डायन होती, तीच आज विकास म्हणून निर्लज्जपणे मिरवली जात आहे, असे निरुपम म्हणाले.वांद्रे पूर्व - खेरवाडी सिग्नलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाटणे मोर्चा काढण्यात आला. या वेळी थाळी-लाटणे वाजवत निषेधाचे फलक फडकावीत महागाईचा व भाजपा सरकारचा निषेध केला. या मोर्चात निरुपम यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
गॉगलवाले भाजपा नेते हरवले कुठे; थाळी मोर्चात काँग्रेसचा सवाल
By admin | Published: October 21, 2015 3:29 AM