Join us

कुठे आलिशान वाहनांची जप्ती, तर कुठे ताेडला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

भारत डायमंडसह रिलायन्सलाही दणका; मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून कारवाईचा धडकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालमत्ता कर थकबाकीपोटी आलिशान ...

भारत डायमंडसह रिलायन्सलाही दणका; मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून कारवाईचा धडका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालमत्ता कर थकबाकीपोटी आलिशान वाहनांची जप्ती करण्याचा पर्याय वापरण्यात आला. काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. २०२०-२१ मध्ये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत ३ हजार ६५० कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे.

अंधेरी येथील सोलिटेयर कॉपोर्रेट पार्क व वरटेक्स बिल्डिंगच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. मलवाहिनीही थोपवण्यात आली. कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले. आय मॅक्स थिएटरची मालमत्ता कराची थकबाकी ही ७५ लाख झाली असल्यामुळे जलजोडणी खंडित करण्यात आली.

आतापर्यंतच्या कारवाईत भारत डायमंड बोर्स यांच्या प्रतिदानाच्या विवादाप्रकरणी तोडगा काढून २५.८६ कोटी मालमता कर वसुली करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विविध मालमतांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तक्रारी प्रकरणातून पक्षकाराकडून ३९ कोटी मालमता कराच्या रकमेची वसुली करण्यात आली.

* बी.एम.डब्ल्यू. कार केली जप्त

चंदुलाल पी. लोहना यांची मालमत्ता कराची ३८ लाख ८० हजार ७०५ थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची बी.एम.डब्ल्यू. कार जप्त करण्यात आली. संबंधितांंद्वारे १९ लाख इतकी रक्कम जमा करून गाडी सोडवून नेण्यात आली. युनिटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची १ कोटी १० लाख २२ हजार २४० थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची ब्रिझा कार जप्त करण्यात आली. ऑफिस सिल केले. बांधकाम बंद करण्यात आले.

---------------------------------