Join us

कुठे विकासाची तर कुठे मातृसेवेची हंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:03 AM

पूर्व उपनगरात दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात कुठे विकासाची तर कुठे मातृसेवेची हंडी फोडण्यात आली.

मुंबई : पूर्व उपनगरात दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात कुठे विकासाची तर कुठे मातृसेवेची हंडी फोडण्यात आली. या वेळी सिनेतारकांबरोबरच राजकीय नेत्यांनीही हजेरी लावत ताल धरला. घाटकोपरमधील राम कदम यांची सर्वांत मोठ्या रकमेची हंडी ठरली. येथील हंडीसाठी २५ लाखांचे बक्षीस लावण्यात आल्याने गोविंदा पथकांनी या ठिकाणी मोर्चा वळविलेला पाहावयास मिळाला.मुलुंड, नाहूर, भांडुप, कांजूर, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातील काही ठिकाणी डोळ्याला पट्टी बांधून हातात काठी घेत महिलांनी हंडी फोडली. तर भांडुपमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी विकासाची हंडी फोडली.घाटकोपरमधील भाजपा आमदार राम कदम यांची हंडी मुंबईतील मोठ्या हंड्यांमध्ये चर्चेत असते. या ठिकाणी २५ लाखांचे बक्षीस लावण्यात आले होते. पूर्व उपनगरातील ही सर्वांत मोठ्या रकमेची हंडी होती. गोविंदा पथके या ठिकाणी वळताना दिसली.>गिरगावात दहीहंडीला सेना-भाजपा आमनेसामनेमुंबई : गिरगावात शिवसेनेतर्फे प्रत्येक वर्षी ठाकूरद्वार शाखेसमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा कांदेवाडीसमोर लोकल मार्केट दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. पण या दहीहंडी उत्सवाचे आयोजन हे भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने करण्यात आले होते. त्यामुळे गिरगावकरांना दहीहंडीला सेना-भाजपा आमनेसामने आलेले पाहायला मिळाले.गिरगावात गेल्या कित्येक वर्षांपासून सेनेचे राज्य होते. पण यंदा या भागात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला यंदा भाजपाचाही रंग दिसून आला. ठाकूरद्वार सिग्नलजवळ असलेल्या शिवसेना शाखेसमोर सेनेची हंडी बांधली जाते. त्याच्या समोरच सेनेच्या स्टेजकडे तोंड करून भाजपाने स्टेज बांधले होते. त्यामुळे कांदेवाडीजवळ भाजपाचे झेंडे तर ठाकूरद्वार बाजूला भगवे झेंडे फडकत होते. मात्र, भाजपाने केलेल्या दहीहंडीला लोकल मार्केट दहीहंडी उत्सव असे नाव दिले होते.गिरगावातील छोट्या गोविंदा पथकांचा उत्साह सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात दिसून आला. गिरगावात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. गिरगावात यंदा डीजेचा दणदणाट नव्हता. १४ वर्षांखालील गोविंदा असल्यास त्यांना सलामी देण्यास परवानगी नाकारली जात होती.मुंबईतल्या चित्ररथाची परंपरा कायम...दहीहंडीच्या दिवशी तत्कालीन विषयावर चित्ररथ तयार करण्याची सुरुवात श्रीकृष्ण उत्सव मंडळ (कोळीवाडा) यांनी केली. यंदाचे या गोविंदा पथकाचे ८४वे वर्ष आहे. यंदा स्वातंत्र्य दिन आणि गोविंदा एका दिवशी आल्याने भारतमाता आणि शेतकरी असा एक देखावा करण्यात आला होता.