विरोधी पक्षनेता असताना आक्रमकता कुठे गेली होती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:37 AM2019-06-08T03:37:14+5:302019-06-08T03:37:31+5:30
अशोक चव्हाण यांचा विखेंवर पलटवार; फाजील आत्मविश्वास उतरेल
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील एका विजयाने आलेला फाजील आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत नक्की उतरेल. अनेकदा लोकसभा आणि विधानसभेचे निकाल वेगवेगळे लागतात. महाराष्ट्रात असे वेगळे निकाल पाहायला मिळतील, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर पलटवार केला. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील एकही जागा आघाडीला मिळणार नाही, असे विधान विखे-पाटील यांनी केले होते.
विखेंबाबत माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, आता अचानक आक्रमकता दाखवली जात आहे. मग, विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना ही आक्रमकता कुठे गेली होती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांना फोन केले जात आहेत. मात्र, आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नाही.
काहींना मुख्यमंत्र्यांचा फोन म्हणजे देवाचाच फोन वाटतो, अशा शब्दात बंडाच्या तयारीत असलेल्या काँग्रेस नेत्यांना चव्हाण यांनी फटकारले. निवडणूक जवळ आली की शिवसेनेला अचानक राम मंदिराची आठवण होते. हे नित्याचेच झालेले आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळत आलेले आहे. आता विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाल्याचेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावर चव्हाण यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. मात्र, संघाची विचारधारा वेगळी आणि आमची वेगळी आहे, असे चव्हाण यांनी याबाबत बोलताना सांगितले.
संघाचे सर्वच काही घेण्यासारखे नाही. उदाहरणे देण्यासाठी इतरही अनेक गोष्टी आहेत. काँग्रेस नेहमीच चिकाटीने संघर्ष करीत आली आहे. आम्ही कधीही संघाचे अनुकरण करणार नाही, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.
‘विखेंच्या भाजपप्रवेशाची औपचारिकता बाकी’
जे लोक आमच्याकडे येत आहेत त्यांना घेण्याचे काम आम्ही करत आहोत. इथे फोडाफोडीचा प्रश्नच येत नाही. आमच्या संपर्कात कोण आहेत, याची यादी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत.
त्यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारेच आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. असे २५ जण आमच्या संपर्कात आहेत, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चव्हाणांच्या आरोपांना उत्तर दिले. प्रत्येकाला मंत्रीपद, आमदारकीचे तिकीट दिले जाईल असे नाही. पण मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्यांना दिलेला शब्द पाळला जाईल, असे सांगतानाच राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचे महाजन म्हणाले.