मुंबई - राज्यातील एसटी कामगारांच्या पगारावरुन आता विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र, महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मोठा संप केला होता. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या संपात सहभाग घेत मविआ सरकारला धारेवर धरले होते. त्यातच, कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते हेही डंके की चोट पे म्हणत आंदोलनात मोठ्या हिरिरीने सहभागी झाले होते. त्यावरुनच, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या आमदार आणि सदावर्तेंना प्रश्न केला आहे.
जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला होता. त्यानंतर, अजित पवार यांनीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना पडळकर आणि सदावर्तेंना लक्ष्य केलं. नाव न घेता सरड्यासारखी रंग बदलणारी असा टोलाही लगावला.
मित्रांनो दीड लाख कोटी रुपयांचा पगार वर्षाचा आम्ही करत होतो, ग्रामसेवकांचा, नर्सेसचा, डॉक्टरांचा, शिक्षकांचा कुणाचाच पगार कमी केला नाही किंवा उशिरा दिला, असं कधीच झालं नाही. राज्यात आमचं सरकार असताना, एसटी संपावेळी काही आमदार तिथं जाऊन आंदोलन करत होते, झोपतं होते. एक तर म्हणायचा डंके की चोट पे करुंगा, डंके की चोट पे करुंगा.... आता कुठं गेला डंका आणि कुठं गेली चोट असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला. राज्यातील एसटी बंद असताना २५० कोटी रुपयांच्या पगारी आम्ही केल्या, अर्थात आम्ही उपकार केले नाहीत. कारण, त्यांची लहान मुले घरात आहेत. पण, माणसं कशी बदलतात बघा सरड्यासारखी. ह्यांच सरकार आलं की ही माणसं काही बोलायला तयार नाहीत. आम्ही सरळमार्गी आहोत, रोकठोक आहोत. पण, ह्यांनी स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून... असं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
प्रत्येक पक्षाने वाचाळवीरांना आवरलं पाहिजे
इतिहासात नाक खुपसू नका, प्रत्येक पक्षाने वाचाळवीरांना आवरले पाहीजे. सध्याचे वातावरण गढूळ झाले आहे. औरंगाबाद शहराला सात दिवसांनी पाणी, कुठे पंधरा दिवसांनी पाणी येते. उशाला धरण आहे दुर्देवाने पाणी मिळत नाही. पाणी पुरवठ्याची योजना ३०० कोटींवरून २८०० कोटींवर गेली. इथे इतकी मंत्रिपद देऊन आणखी लोक सूटकोट रेडी करून बसलेत. लोकांचे प्रश्न समजून घेत आरोप प्रत्यारोपापेक्षा समस्या प्रश्न सोडवले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
बाळासाहेबांना आधीच कल्पना दिली होती
नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत अजित पवार म्हणाले की, असं काहीतरी कानावर येतेय, तुम्ही काळजी घ्या, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरात यांना पूर्णपणे आदल्यादिवशी सांगितले होते. पण ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू, उद्या डॉ. तांबेंचाच अर्ज भरणार आहेत, असं बाळासाहेबांनी म्हटल्याचं चांगलं मला आठवतंय असं त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरातांनी अजित पवारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.