मुंबई/जळगाव - राज्याच्या राजकारणात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकात सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वच्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे राजकारण रंगात आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या ८ दिवसांपासून नॉच रिचेबल आहेत, असे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहेत. त्यामुळे, जळगावच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीतही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, नाथाभाऊ नेमके गेले कुठे? जळगावात आहेत की, मुंबईत असा प्रश्न मतदारसंघातील जनतेला पडला आहे.
जळगावातील बडे नेते आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ खडसेंची सर्वपरिचीत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांसाठी एका फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे नाथाभाऊ म्हणूनही सर्वांना माहिती आहेत. यापूर्वी त्यांचे काही कॉल रेकॉर्डींगही व्हायरल झाले होते, ज्यामुळे गावातील पाणीप्रश्नासाठीही कार्यकर्ते थेट नाथाभाऊंशी फोनवर संपर्क साधतात ते महाराष्ट्राने ऐकले. मात्र, एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब असून त्यांचा फोनदेखील लागत नसल्याची तक्रार सर्वसामान्य कार्यकर्ते करत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या ५ ते ६ दिवसांपासून कुठल्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क झालेला नाही. त्यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं समजतंय. त्यामुळे, यामागे नेमकं काय राजकारण शिजतंय याचीही चर्चा होत आहे.
दरम्यान, नुकतेच झालेल्या दूध संघाच्या निवडणुकी नाथाभाऊंच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांचा अपेक्षाभंग झाला, त्यामुळे ते राष्ट्रवादीतही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच, ते आमदार झाले अन् महाविकास आघाडीची सत्ता गेली. त्यामुळे, मंत्रीपदाची संधीही हुकली. तर, राष्ट्रवादीतही केवळ आमदारकी मिळाली, बाकी कुठलीही जबाबदारी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे, नाथाभाऊंच्या राजकीय भविष्यावर चर्चा होत आहेत. कदाचित याच कारणामुळे ते नॉट रिचेबल असावेत असा अंदाज व्यक्त होत असून राज्याच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय हे पाहावे लागेल.