मिठी नदीचा गाळ गेला कुठे? २००५ पासूनच्या कामाची एसआयटी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:46 AM2023-07-26T05:46:45+5:302023-07-26T05:47:02+5:30
मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणावर ११६० कोटी खर्च झाले.
मुंबई : मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणावर ११६० कोटी खर्च झाले. याचे कंत्राटदार कोण, किती पैसे कुठे खर्च करण्यात आले, २००५ ते २०२३ पर्यंत किती गाळ काढण्यात आला, किती सौंदर्यीकरण करण्यात आले? या सर्व कामाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.
प्रसाद लाड यांनी मिठी नदीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. यावेळी लाड यांनी मिठी नदीच्या कामाची माहिती सामंत यांच्याकडे मागितली. मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे सांगून संबंधित काम पालिका आणि एमएमआरडीए यांच्याकडे असल्याचे सामंत यांनी सांगितले. सामंत यांनी दिलेल्या उत्तराला अनिल परब यांनी आक्षेप घेतला. मंत्री सभागृहात खोटी माहिती देत आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यावर सामंत यांनी आम्ही कोणतीही खोटी माहिती दिली नाही. आम्हालाही सभागृहात चार वर्षाचा अनुभव आहे, असा टोला लगावला.
कुणाच्या खिशात किती चिखल गेला : अनिल परब
अनिल परब यांनी मिठी नदीचा चिखल कुणाकुणाच्या अंगावर उडाला आहे, कुणाच्या खिशात गेला आहे? याचा एकदा सोक्षमोक्ष लावाच, अशी मागणी सभागृहात केली. अगदी २००५ ते आताच्या २०२३ पर्यंतची चौकशी करा. मग त्यात जी नावे समोर येतील, त्यानंतर ही चौकशीच गुंडाळली जाईल, असे ते म्हणाले.
सौंदर्यीकरण लवकरच
सौंदर्यीकरणासाठी एजन्सी नेमली आहे. डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेकडे हा आराखडा सादर करण्यात आला असून काही दिवसांतच सौंदर्यीकरणाचे काम करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
नागरिकांचे पुनर्वसन कधी?
मिठी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कुर्ला येथील संदेशनगर, बैल बाजार आणि क्रांतीनगर येथील रहिवाशांचे पुनर्वसन कधी करणार, असा प्रश्न राजहंस सिंह यांनी उपस्थित केला. यावेळी अनिल परब यांनी येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नसल्याची बाब निदर्शनास आणली. यावर संबंधित यंत्रणांना लवकरात लवकर पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले जातील, असे सामंत म्हणाले.
गाळ गेला कुठे?
२०२२ साली किती टन गाळ काढला हे सांगितले, पण हा गाळ कुठे टाकला. आपल्याकडे तो टाकण्यासाठी जागाच नाही.
नदी पात्रावरील अतिक्रमण, तेथील रहिवाशांचे स्थलांतर कधी केले जाईल?, असा मुद्दा भाई जगताप यांनी उपस्थित केला. यावर भिवंडी येथे गाळ टाकण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे.
आसपासच्या गावात गाळ नेमका कुठे टाकला याची माहिती उपलब्ध नाही, असे सामंत यांनी उत्तरात स्पष्ट केले.