मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पुराला कारणीभूत ठरणाऱ्या मिठी नदीच्या सुशोभीकरणासह नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेल्या कामांवर कॅग रिपोर्टमध्ये आसूड ओढण्यात आले आहेत. मिठी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली त्यात अनियमितता असून, मुंबई महापालिकेने नियमांचे उल्लंघन करत एकाच कंत्राटदाराला चारही कामे दिल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
मिठी नदीच्या साफसफाईचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मुंबई महापालिकेने या नदीवर यापूर्वी केलेल्या कामांची झाडाझडती घेतली जाते. विशेषतः केवळ मान्सूनपूर्वी मिठी साफ केली जात असल्याने लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मुंबई महापालिकेवर टीका केली जाते.
नदीचा मार्ग असा...
टायगर हिलमधून उगम - २१ किमी लांबीची मिठी नदी पवईच्या ९०० फूट उंच टायगर हिलमधून उगम पावते. साकीनाका, कुर्ला, कालिना, वांद्रे, खार, माहीम येथून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. पवई तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. जेव्हा जेव्हा मोठा पाऊस येतो तेव्हा तेव्हा या परिसरामध्ये मिठी नदीचे पाणी शिरते.
- मिठी नदीचा उगम विहार आणि पवई जलाशयाच्या प्रवाहातून होतो.
- मिठीची लांबी १७.८४ किलोमीटर आहे. मिठी नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी आणि नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीच्या खालून वाहते. नंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते.
- मिठी नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर आहे.
- मिठी नदी उगमस्थान समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंच आहे. मिठी नदीचा ११.८४ किलोमीटर लांबीचा भाग मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे, तर ६ किलोमीटर लांबीचा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे.
मिठी नदीच्या विकासासाठी २६ जुलै २००५ पासून आजमितीस १ हजार १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मिठी साफ होत नाही. कारण आजही सांडपाणी, रासायनिक सांडपाणी नदीत सोडले जात आहे.