मुंबई - सर्वांच्या मनात शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण होत राहते. रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी व त्याकरता लढण्यासाठी तलवार हाती घेण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा व जिद्द मिळते, असे उद्गार मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी काढले. तसेच, कोरोनाविरुद्धच्या लढाई लढताना आपल्याला तलावार आणि ढाल हाती घेण्याची गरज नाही. पण, या लढाईत मास्क हीच आपली लढाई असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर, रविवारी नागरिकांशी संवाद साधतानाही त्यांनी मास्क हीच ढाल असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावरुन, भाजपाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.
शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्क हीच आपली ढाल असल्याचं म्हटलं. तसेच, रविवारी जनतेशी संवाद साधतानाही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. त्यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील शिवनेरीवर झालेला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे काही छायाचित्रे असलेला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिवनेरीवरील या सोहळ्यात काही भक्तांच्या तोंडाला मास्क लावला नसल्याचे दिसून येते. त्यावरुन, निर्बंध आणि नियम फक्त जनतेसाठीच का? मास्क ही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ढाल असेल तर तुम्ही स्वतः उपस्थित असताना शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?, असा सवाल भाजपाने विचारला आहे.
तसेच, राणीच्या बागेकडेही लक्ष द्या, असे म्हणत राणीच्या बागेतील गर्दीवरुनही भाजपाने महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय.