"सभेसाठी ७ कोटी कुठून आले?"; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:32 AM2023-10-13T09:32:20+5:302023-10-13T09:49:59+5:30
अंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेवरुन आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि जरांगे पाटील आमने-सामने आले आहेत.
मुंबई - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज करत आहे. त्यासाठी, मोठ्या संख्येने मराठा समाज एकटवला असून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. दरम्यान, ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला असून आता सभेवरुनही प्रश्न-उत्तरे सुरू असल्याचे दिसून येते. जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले होते. त्यात, आता छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांच्या सभेच्या खर्चावरुन प्रश्न उपस्थित केला आहे.
अंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेवरुन आता पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि जरांगे पाटील आमने-सामने आले आहेत. अंतरवालीतील सभेसाठी ७ कोटी रुपये कोठून आले असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. आता, भुजबळांच्या या प्रश्नावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर, भुजबळांच्या टीकेला जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे. डिझेल टाकण्यासाठी १-२ हजार रुपये देऊ का, असा खोचक टोमणा जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला आहे.
समता परिषदेच्या बैठकीत बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. १०० एकरात शेती साफ करुन मैदान करताय, ७ कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियातून समोर आली. त्यानतंर, या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
जरांगे पाटलांचा पलटवार
"भुजबळ म्हणतात 7 कोटी कोठून आले. त्यांना कोणी सांगितले 7 कोटी जमा झाल्याच. त्याला (भुजबळांना) पाहिजे का दोन एक हजार रुपये डिझेल टाकायला,” असे प्रत्युत्तर जरांगे यांनी दिले. तसेच, भुजबळ आता काहीही बोलयला लागले आहे. त्यांना काही झालं आहे का? सरकारने त्यांना लवकर रुग्णालयात नेले पाहिजे. एवढा मोठा माणूस असे काहीही कसा बोलू शकतो. मी केलेल्या एवढ्या दौऱ्यात एकही मराठा म्हणाला मी 50 रुपये घेतले, तर तो म्हणेल ते करायला मी तयार आहे. त्यामुळे, राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता मराठा आणि ओबीसी असा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोलापूरातील सभेतूनही भुजबळांवर निशाणा
छगन भुजबळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरातील जाहीर सभेत दिला होता. जरांगे पाटील म्हणाले, आजवर आम्ही कोणत्याही नेत्याच्या बोलणे टाळत होतो. पण, एकाने छत्रपती संभाजीनगरात आमची जाहीर सभा होऊ देणार नाही असे म्हटले. भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आमच्या अंगावर सोडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे करत आहात का? असा सवाल ही जरांगे पाटील यांनी केला होता.