एवढी संपत्ती आली कुठून? राज ठाकरेंची आधीच चौकशी व्हायला हवी होती - अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:23 PM2019-08-22T15:23:22+5:302019-08-22T15:31:20+5:30
कोहिनूर मीलच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज चौकशी सुरू आहे.
मुंबई - कोहिनूर मीलच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज चौकशी सुरू आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांची आधीच चौकशी व्हायला हवी होती असे सांगत त्यांच्या चौकशीसाठी निवडलेली वेळ चुकीची असल्याचे मत मांडले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतावा अंजली दमानिया म्हणाल्या की, ''राज ठाकरे यांची चौकशी आधीच व्हायला हवी होती. आता या परिस्थितीत चौकशीसाठी निवडण्यात आलेली वेळ चुकीची आहे. तसेच राज ठाकरे सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय? हेसुद्धा समोर येणे आवश्यक आहे.''
दरम्यान, ईडीच्या चौकशीसाठी जाताना सहकुटुंब सहपरिवार बाहेर पडल्याने अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी विचारणा त्यांनी केली होती. ''राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न.'' असा टोला दमानिया यांनी लगावला होता.
I welcome the move of arresting Chidambaram and interrogating Raj Thackeray. Waiting for them to investigate Vadra but, BJP should also investigate Yedurappa, Reddy brothers, Shivraj Singh Chouhan and Mukul Roy, or is it only applicable to Opposition leaders who don't join BJP??
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 21, 2019
तसेच अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र भजपाने आपल्याही नेत्यांची अशीच चौकशी करावी, असे आव्हानही दमानिया यांनी दिले. चिदंबरम आणि राज ठाकरेंविरोधात झालेल्या कारवाईचे स्वागतच आहे. आता रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही कारवाई होईल. भाजपाने आता येडियुरप्पा, रेड्डी बंधू, शिवराज सिंह चौहान, मुकूल रॉय यांचीही चौकशी करावी, अन्यथा भ्रष्चाराविरोधातील ही कारवाई केवळ भाजपामध्ये प्रवेश न करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांविरोधातील कारवाई बनून राहील, अशा टोला दमानिया यांनी लगावला आहे.