मुंबई - कोहिनूर मीलच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज चौकशी सुरू आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांची आधीच चौकशी व्हायला हवी होती असे सांगत त्यांच्या चौकशीसाठी निवडलेली वेळ चुकीची असल्याचे मत मांडले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतावा अंजली दमानिया म्हणाल्या की, ''राज ठाकरे यांची चौकशी आधीच व्हायला हवी होती. आता या परिस्थितीत चौकशीसाठी निवडण्यात आलेली वेळ चुकीची आहे. तसेच राज ठाकरे सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय? हेसुद्धा समोर येणे आवश्यक आहे.'' दरम्यान, ईडीच्या चौकशीसाठी जाताना सहकुटुंब सहपरिवार बाहेर पडल्याने अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी विचारणा त्यांनी केली होती. ''राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न.'' असा टोला दमानिया यांनी लगावला होता.
एवढी संपत्ती आली कुठून? राज ठाकरेंची आधीच चौकशी व्हायला हवी होती - अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 3:23 PM