कृषी, महसूलचे कर्मचारी जातात तरी कुठे?; मुख्यमंत्र्यांचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 02:18 AM2019-06-08T02:18:30+5:302019-06-08T06:09:43+5:30
प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादीच तयार नसल्याचे उघड
मुंबई : कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी दुष्काळग्रस्त गावागावांमध्ये जात नाहीत. जिथे जिल्हाधिकारी मैदानात उतरुन काम करताहेत तिथे काम चांगले आहे पण ते सगळीकडे का दिसत नाही, असे खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी खरिप हंगाम आढावा बैठकीत सुनावले.
कर्मचारी खरेच शेतकऱ्यांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाही याची खातरजमा करणारी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ राज्यातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळतील. त्यातील ३० लाख शेतकºयांच्याच अधिकृत याद्या अद्याप तयार झालेल्या आहेत. या कामाला गती द्या, असे त्यांनी बजावले.
ही बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पदुम मंत्री महादेव जानकर, रोहयो मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, दीपक केसरकर, दादाजी भुसे, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
कमी पाऊस होऊनही उत्पादकता वाढली
राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलयुक्त/जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. २०१२-१३ मध्ये ९० टक्के पाऊस झाला होता, उत्पादन १२८ लाख मेट्रिक टन झाले. २०१४-१५ मध्ये ७० टक्के पाऊस झाला, उत्पादकता ८२ लाख मेट्रिक टन होती. गेल्यावर्षी ७३ टक्के पाऊस झाला आणि उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टनावर पोहोचली आहे.या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकºयांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत. पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकºयांनी पेरणी करावी. जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट टळेल. हवामान खात्याने जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडेल. यंदाचा खरीप यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी सज्ज आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, त्याआधी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले.
असा आहे पावसाचा अंदाज
हवामान विभागाने यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. संपूर्ण देशात ९६ टक्के पर्जन्यमान होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी ९३ ते १०७ टक्के, मराठवाड्यात ९० ते १११ टक्के तर विदर्भात ९२ ते १०८ टक्के टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे.
जूनमध्ये कमी तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हंगामासाठी आवश्यक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.