Join us

विमानातून लोक कुठं जातात ? दुबई, लंडन अन् अबु धाबीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 8:34 AM

नोव्हेंबर महिन्यात मुंबईतून केला ४४ लाख लोकांनी विमान प्रवास

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात मुंबई विमानतळाने प्रवासी संख्येचा नवा विक्रम रचला असून, या महिन्यात मुंबई विमानतळावरून तब्बल ४४ लाख ६० हजार लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत १३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात केवळ विक्रमी प्रवासी संख्याच नोंदली गेली नाही तर आणखीही दोन विक्रम नोंदले गेले आहेत. यापैकी ११ नोव्हेंबर या दिवशी मुंबई विमानतळावर एका दिवशी १०३२ विमानांची आवक-जावक झाली आहे. दिल्लीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळावर रोज ९०० च्या आसपास विमानांची वाहतूक होते. त्याऐवजी १०० अतिरिक्त विमानांची वाहतूक मुंबई विमानतळाने हाताळली आहे. तर संपूर्ण महिन्यात मुंबई विमानतळावरून एकूण २८ हजार ६७९ विमानांची वाहतूक झाली.

 मुंबईतून प्रवास केलेल्या लोकांनी देशांतर्गत प्रवासासाठी दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नईला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले.

 आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये सर्वाधिक प्रवास हा दुबई, लंडन, अबुधाबी येथे झाल्याची नोंद आहे.

एका दिवसात १ लाख ६७ हजार जणांचा प्रवास

 २५ नोव्हेंबर या एका दिवसात मुंबई विमानतळावरून तब्बल १ लाख ६८ हजार जणांनी प्रवास केला आहे. एका दिवसातील प्रवासी संख्येचा हा उच्चांक आहे.

  यापैकी, १ लाख २० हजार लोकांनी देशांतर्गत प्रवास केला तर ४६ हजार लोकांनी परदेशासाठी उड्डाण केले.

टॅग्स :विमान