Join us

रमझानचे रोजा साहित्य जातेय कुठे?; मालाडच्या पी उत्तरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 1:50 AM

अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार

मुंबई : रमजानच्या पवित्र महिन्यात रोजासाठी (उपवास) लागणारे सामान पालिकेकडून वाटप करण्यात येत आहे. मात्र मुंबईचे पालकमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या मालवणीत गेल्या काही दिवसांपासून हे साहित्य मिळतच नसल्याची तक्रार येत आहे. त्यामुळे हे साहित्य जातेय तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असून पी उत्तर विभागातील मुख्य संबंधित अधिकारीदेखील याबाबत काहीच सांगण्यास तयार नसल्याने मुस्लीम बांधवांमध्ये याबाबत रोष आहे.

मालाडच्या मालवणी परिसरात मुस्लीम बांधवांची संख्या मोठी असून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील याच परिसरात राहतात. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउनदरम्यान मुस्लीम बांधवांच्या रमझान य पवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. त्यानुसार त्यांच्या उपवासासाठी लागणारे साहित्य पालिकेकडून पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मालवणीत हे साहित्य मिळतच नसल्याचे स्थानिक समाजसेवी संस्था ‘वंदे मातरम्’चे सचिव फिरोज शेख यांचे म्हणणे आहे. त्यानुसार ते नेमके कुठे देण्यात येतेय? याबाबत जाणून घेण्यासाठी पालिकेच्या पी उत्तर विभागातील समाज विकास अधिकारी (सीडीओ) महेंद्र गभने यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्यांना चार ते पाच तास ताटकळत ठेवून अखेर कोरोनामुळे आपण भेटू शकत नाही, असे सांगितले. मात्र महामारीच्या स्थितीतही रमजान साहित्यासाठी त्यांना आठ दिवस हेलपाटे घालायला लावत त्यांचा जीव धोक्यात टाकला; मात्र काहीच सहकार्य केले नसल्याचेही ते म्हणाले. आम्हाला निदान २०० पाकिटे पालिकेने दिल्यास ती गरजवंतांना पोहोचविण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, असे निवेदनही त्यांनी पालिकेला दिले आहे. मात्र याबाबत काहीच दाद दिली जात नसल्याचेही ते म्हणाले.प्रतिसाद नाहीच

  • पालिकेकडून सीडीओ यादी जाहीर करण्यात आली आहे. जेणेकरून एखाद्याला काही समस्या असल्यास त्यांना संपर्क करता येऊ शकेल.
  • मात्र गभने हे फोनच उचलत नसल्याची तक्रार आहे. त्यानुसार ‘लोकमत’ प्रतिनिधीने याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
  • मात्र सतत फोन आणि मेसेज करूनसुद्धा त्यांनी काहीच उत्तर न दिल्याने स्थानिकांचा आरोप खरा असल्याचे उघड झाले आहे.
टॅग्स :रमजान