तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह, आमदार खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरु झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. तब्बल ६०० गाड्यांच्या ताफ्यासह के. चंद्रशेखर राव सोलापूरात दाखल झाले. के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात येऊन हे शक्तिप्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवत आहात?, तुमचा पक्ष तेलंगणात. तुम्ही महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे. अनेक माजी मंत्री, अनेक माजी खासदार आणि प्रमुख नेते यांनी काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. हा त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा हादरा आहे. त्यांचे प्रमुख लोक काँग्रेसमध्ये गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तेलंगणातला हा जो पक्ष महाराष्ट्रात ६०० गाड्या ७०० गाड्या आणून हे पैशाचं, संपत्तीचं, सत्तेचा ओंघळवान दर्शन आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. तसेच केसीआर यांचा पक्ष बीआरएस भाजपाची बी टीम आहे. राज्याची जनता सुज्ञ आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला.
के. सी. आर जवळपास नऊ दहा वर्ष तेलंगणाचे किंवा आंध्रमध्ये मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतलं का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. इतक्या वर्ष पंढरपूरच्या विठ्ठलाकडे दर्शनासाठी आल्याचा माझ्याकडे इतिहास नाही. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते विकत घेणे, प्रसिद्ध करणे, हा पैसा इथे येतो कुठून? याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी यावेळी केली. तसेच के. सी. आर आमचे व्यक्तिगत मित्र आहेत. त्यांनी ठरवायला पाहिजे आपल्याला नक्की कोणा बरोबर राहायला हवं, असंही संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे स्वत: मंत्रिमंडळातील पंधरा सहकारी, खासदार, आमदार व अधिकारी असा मोठा फौजफाटा घेऊन सोमवारी सकाळी हैदराबाद येथून रस्ता मार्गाने निघाले. जवळपास ३०० वाहनांचा ताफा असून, धाराशिव जिल्ह्यातील मुरुम मोड येथील एका मंगल कार्यालयात त्यांनी दुपारचे भोजन घेतले. मागील दोन दिवसांपासून दीड हजार लोकांच्या भोजनांची तयारी सुरू होती. यासाठी खानसामे व अन्न प्रशासनाचे अधिकारीही येथे तळ ठोकून होते.