Join us

भारतात फटाके नेमके आले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:39 AM

संशोधनानुसार फटाके हे चीनचं इन्वेन्शन. म्हणजे गन पावडर किंवा आतषबाजीच्या दारूचा शोधही त्याच देशाचा.

- सिद्धार्थ ताराबाई(मुख्य उपसंपादक)

आज आनंदाचा प्रत्येक सोहळा फटाक्यांच्या ‘फोडणी’शिवाय साजरा होत नाही. मग ते उमेदवारी घोषित होणं असो, निवडणुकीतला विजयोत्सव असो, गणेशोत्सव असो की लग्नकार्य, फटाके फुटणारच. भारतीय कृषी समाज संस्कृतीचा भाग असलेल्या दिवाळीत, दिव्यांच्या या उत्सवात प्रदूषणकारी फटाक्यांचा शिरकाव (खरं तर घुसखोरी) कधी, कसा आणि कुठून झाला हे सांगणं महाकठीण ! पण त्यांचा इतिहास मात्र त्यांच्या आतषबाजीइतकाच मनोरंजक आहे. आज जसं सुई-दोऱ्यापासून रॉकेटच्या सुट्या भागांपर्यंत मेड इन चायना असतं अगदी तसंच फटाक्यांचं मूळ चीनमध्ये.

संशोधनानुसार फटाके हे चीनचं इन्वेन्शन. म्हणजे गन पावडर किंवा आतषबाजीच्या दारूचा शोधही त्याच देशाचा. फटाक्यांचा मूळ पुरुष (बांबूचा फटाका) प्राचीन चीनमध्ये जन्मला आणि तेथून त्याचे वंशज पश्चिम आशिया, युरोप, अमेरिका आणि बहुधा पूर्व आशिया म्हणजे भारतीय उपखंडात पोहोचले. पण फटाक्यांमध्ये मनोहारी रंग भरले ते युरोपने. फटाक्यांची कुळकथा सांगणारी अनेक पुस्तकं, संकेतस्थळं आहेत. त्या सर्वांचं चीन हाच फटाक्यांचा कुळपुरुष असल्यावर एकमत आहे. फटाक्यांचा भारतातला इतिहास पी. के. गोडे यांचा ‘भारतातील फटाक्यांचा इतिहास’ हा सत्तरेक वर्षांपूर्वीचा शोधनिबंध लक्षणीय.    सर्वसाधारणपणे १५व्या शतकाच्या मध्यावर भारतात आतषबाजी सुरू झाली असावी. फटाके भारतात आल्यानंतर राजा-महाराजांनी आतषबाजीचे सोहळे आयोजित केले. त्यांचे नेत्रोत्तेजक, विलोभनीय आविष्कार भाषाप्रभूंनी शब्दालंकारित केले.  

अग्निक्रीडा (गणेश बाबाजी माटे), अग्निचमत्कार (गोविंद मोरोबा कार्लेकर), आतषबाजी (गर्गे) ही त्यातली काही मराठी उदाहरणं. इतिहाससंशोधक रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचा हिंदुस्थानातील इंग्रजी आतषबाजी हा निबंधही या अनुषंगाने महत्त्वाचा. संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर कवितेत रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहवरातीचे वर्णन करताना अग्नियंत्र (रॉकेट), हवई, सुमनमाळा, चिचुंदरी, भुईनळा, हातनळा, बाण, चंद्रज्योती आदी अनेक मराठी नावे धारण केलेल्या फटाक्यांची शब्दश: आतषबाजी केली आहे.मोहयन्त्री सुमनमाळा I अग्निपुष्पें भासती डोळा I फुलें म्हणती अबला I पाहतां डोळा ते राख II११६IIअतिलोभाची चिचुंदरी I अग्नि लावूनी टाकिली दूरी Iपेटल्या पडती जनावरीI उरी शिरी जाळित II१२०IIसंत रामदासांनीही फटाक्यांच्या आतषबाजी वर्णने लिहून ठेवली आहेत. दिवट्या हिलाल चंद्रज्योती I बाण  हवया झळकती Iनळे, चिचुंद्र्या धावती I चंचळत्वे II ६ II छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे उल्लेख नाहीत, पण पेशवाईत मात्र उदंड फटाके फुटले. पर्वतीच्या पायथ्याशी  आतषबाजीचा पहिला नयनरम्य सोहळा संपन्न झाला होता.  खरं तर फटाके सर्वधर्मसमभावाचं प्रतीक. त्यात कुणाचीही मक्तेदारी नाही. असो. या दिवाळीत फटाके फोडा, पण सर्व प्रकारचं भान राखून.

टॅग्स :दिवाळी 2024