पराभवाने कुठे शुकशुकाट, तर कुठे सुस्कारा, निराशेमुळे कार्यकर्ते फिरले माघारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:26 AM2019-05-24T01:26:05+5:302019-05-24T01:26:19+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या वेळेस गेलेली प्रतिष्ठा परत मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता.
मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर या वेळेस गेलेली प्रतिष्ठा परत मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. परंतु अथक प्रयत्नांनंतरही सहाही मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. याची प्रचिती मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत आल्यानंतर काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर शुकशुकाट दिसून आला. तर मुंबईत नव्हे पण राज्यात काही जागांवर विजय मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुस्कारा सोडला.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. ही मानहानी भरून काढण्यासाठी व पक्षाचे अस्तित्व टिकून राहावे, याकरिता काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. दक्षिण मुंबईतील उमेदवार मिलिंद देवरा यांना मुंबईचे अध्यक्षपद दिले.
तर प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून, उत्तर मध्य येथून प्रिया दत्त आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली. यापैकी देवरा आणि प्रिया दत्ता यांच्या जागा निवडून येतील अशी काँग्रेसला आशा होती. परंतु मनसे फॅक्टरचाही फायदा काँग्रेसला म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या पक्ष कार्यालयाकडे कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. सकाळी काही जणांनी हजेरी लावली. मात्र जसजसे युतीच्या बाजूने ट्रेण्ड दिसून येऊ लागले तसतसे या कार्यकर्त्यांनीही काढता पाय घेतला.
ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील निवडणुकीत होते. त्यांच्या विरोधात भाजपचे पालिकेतील गटनेते नगरसेवक मनोज कोटक निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघातील पक्षांतर्गत वादाचा फायदा पाटील यांना मिळेल, असे वाटत होते. मात्र कोटक दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातही शुकशुकाटच होता.
राज्यातील काही जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय घोषित होताच कार्यकर्त्यांमध्ये थोडेसे बळ आले आणि सुस्कारा सोडत पेढे आणण्यासाठी ते धावले.
>कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये बळ आणण्यासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरली होती. कार्यकर्तेही त्याच जोमाने मैदानात उतरले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांना आशा वाटू लागली होती. निकालानंतर कार्यकर्ते नाराज झाले़