कुठे गेले ‘अच्छे दिन’?
By Admin | Published: May 27, 2015 01:54 AM2015-05-27T01:54:43+5:302015-05-27T01:54:43+5:30
‘अच्छे दिन’चे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणीत सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील मूळ प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
मुंबई : ‘अच्छे दिन’चे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणीत सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील मूळ प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे मतांसाठी भाजपा सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुंबई काँग्रेसने मंगळवारी गिरगाव ते आझाद मैदान महामोर्चा काढला. या वेळी ‘मोदी सरकार, फेकू सरकार’ अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत मोर्चात सहभाग घेतला. राज्यात सर्व जिल्ह्यांत काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली़
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे रूपांतर आझाद मैदानावर आल्यानंतर विराट सभेत झाले. गेल्या वर्षभरात एकाही वस्तूचे भाव कमी करता आले नाही. उलट सरकारने प्लॅटफॉर्म तिकीट, मेट्रो तिकीट आणि बेस्टच्या तिकीट दरात वाढ केल्याचा आरोप निरुपम यांनी या वेळी केला़
तसेच राज्यभर सर्वत्र सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या निवडणुकीतील घोषणांच्या होर्डिंगला हार घालून ‘अच्छे दिन’ला प्रतीकात्मक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाशिममध्ये पाटणी चौकात कार्यकर्त्यांनी मुंडण करून मोदी सरकारचा निषेध केला. बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आदी ठिकाणीही निदर्शने करण्यात आली़ नाशिक, मालेगाव, नंदुरबार, श्रीरामपूर, अहमदनगर, जळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी केली. तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली़
कोकणात कणकवली, रत्नागिरी, पनवेल, उल्हासनगर, वाशी, पालघर, भार्इंदर, भिवंडी, वसई, कल्याण, शहापूर व ठाणे शहरात कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तर नांदेड, परभणी, उस्मानाबादमध्ये निदर्शने करण्यात आली़ औरंगाबाद शहरात मोक्षरथ काढून निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता पोलीस जिमखाना येथे जमा झाले. मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. १२.१५ वाजता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पोलिसांना चकवा देत थेट रस्त्यावर मोर्चाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली.