मुंबई : पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या दुसऱ्या पावसानेच वेळेआधी १०० टक्के नालेसफाई, खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि शिंदे फडणवीस सरकारचे सर्व दावे फोल ठरवले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. अंधेरी सबवे तर जलमय झाल्याने संपूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले. मागाठाणे येथे भूसख्खलन झाले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याच्या शेकडो तक्रारी येत आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या पावसात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्ती तसेच खड्डेमुक्तीसाठी या वर्षी १४४ कोटी आणि आणि नालेसफाईसाठी २५७ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून केला जात आहे. पहिल्या दुसऱ्या पावसाने मुंबईकरांचे अत्यंत हाल झाले, मग मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे ? हे पैसे त्यांनी कुणाच्या घशात घातले, यामध्ये घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे त्याला जबाबदार कोण ?? असा संतप्त सवाल आज मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
दरवर्षी रस्त्यावरील खड्डेदुरुस्ती आणि नालेसफाईच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. पण परिस्थिती काही बदलत नाही. नालेसफाई पूर्णपणे केली जात नाही. खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही. रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण नालेसफाई आणि त्यामुळे ठिकठिकाणी तुंबणारे पाणी, यातच मुंबईकरांना संपूर्ण पावसाळा काढावा लागतो. मुंबई महानगरपालिकेच्या या भ्रष्ट आणि ढिल्या कारभारामुळेच जो प्रामाणिकपणे कर भरतो, अशा सर्वसामान्य मुंबईकर नागरिकाला हा मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.
कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा मुंबईची तुंबई का होते, याची चौकशी करणे गरजेचे आहे. याला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मुंबई काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त यांनी मुंबईकरांना आश्वासन दिले होते की यावेळी मुंबईत पाणी तुंबणार नाही. मुंबईची तुंबई होणार नाही. मुख्यमंत्री तर म्हणाले होते की, जर मुंबईत पाणी साचले आणि मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला तर जबाबदार पालिका अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवू आणि कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री आता कोणावर आणि कधी कारवाई करणार आहेत? भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देणार आहेत की नाही? असा सवाल त्यांनी केला.