कुठे उष्णतेची लाट; तर कुठे अवेळी पाऊस, दोन दिवस मुंबई राहणार ढगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:42 AM2019-05-07T07:42:32+5:302019-05-07T07:42:42+5:30
‘फोनी’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असतानाच मुंबईसह राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भाला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : ‘फोनी’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असतानाच मुंबईसह राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत आहेत. विदर्भाला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी मुंबईमधील वातावरण किंचित ‘उष्ण’ नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, ३३ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ६ ते ८ मे दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट राहील. ७ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील. ८ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
१० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.