Join us  

राज्यात कुठे जोरधारा, कुठे केवळ वारा; पूरसदृश स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 6:04 AM

विदर्भ, कोकणसह  राज्याच्या पश्चिम भागात पूरसदृश स्थिती असली, तरी अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क | मुंबई : विदर्भ, कोकणसह  राज्याच्या पश्चिम भागात पूरसदृश स्थिती असली, तरी अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. खान्देश व मध्य महाराष्ट्रात तर केवळ पिकांना जीवदान देण्यापुरता रिमझिम पाऊस पडत असून, पाऊस थांबताच केव्हाही पिके माना टाकतील, अशी परिस्थिती आहे. मध्य महाराष्ट्र सध्या तहानलेलाच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांच्या निम्म्या भागात मुसळधार तर निम्मा जिल्हा कोरडा अशी परिस्थिती आहे. धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण अजूनही उणे २८ टक्क्यावरच आहे.

गडचिराेली : पावसाचा जाेर सुरूच 

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जाेर सुरूच आहे. सततच्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. शनिवारी जिल्ह्यातील १३ प्रमुख मार्ग बंद हाेते. शनिवारी जिल्ह्यात सरसरी ४८.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचल्याने धान पीक सडण्याचा धाेका निर्माण झाला आहे. वैनगंगा, प्राणहिता, गाेदावरी या प्रमुख नद्या अजूनही दुथडी भरून वाहत आहेत. रविवारीसुद्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वर्धा : रस्ते पाण्याखाली 

जिल्ह्यात मागील २४ तासांत ५०.७ मिलिमीटर पाऊस झाला असून, चार महसूल मंडळांत ढगफुटीसदृश, तर नऊ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. सततच्या पावसामुळे जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवत दहा रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील २४ तासांत कुठे संततधार तर कुठे मुसळधार जोर कायम ठेवलेला पाऊस शनिवारी थांबून-थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कायम होता. नदी व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून जिल्ह्यावर पूरस्थितीचे संकट ओढवले. पुलावरून पाणी वाहत असल्याने सात जिल्हा प्रमुख मार्ग तर तीन राज्य मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अकोला : घरांचे नुकसान, रस्ते बंद 

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील माळेगाव, अडगाव, पंचगव्हाण, हिवरखेड, तर अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोर्णा नदीला पूर आल्याने आगर-उगवा नाल्याला पूर आल्याने अकोट-वणी वारुळा-मुंडगाव, तेल्हारा तालुक्यात विद्रुपा नदी व नाल्याला पूर आल्याने मनब्दा-भांबेरी, मूर्तिजापूर तालुक्यात पुरामुळे ब्रम्ही खुर्द-सेलू बाजार, कमळणी नदीला पूर आल्याने कमळखेड- निंबा-धानोरा पाटेकरकडे जाणारा रस्ता बंद आहे. जिल्ह्यात १४५ घरांचे अंशत: नुकसान झाले.

अमरावती : १० दिवसांपासून धारा

जिल्ह्यात दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने प्रकल्पात नियोजित जलसाठा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे ऊर्ध्व वर्धाचे ११, पूर्णा प्रकल्पाचे पाच व बगाजीसागरचे १९ दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. विसर्गामुळे नदी-नाले प्रवाहित झाल्याने काठालगतच्या शेतातील पिकांत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे. पूर परिस्थितीमुळे अनेक तालुक्यात गावांचा संपर्क तुटला आहे.   

यवतमाळ : पहिल्यांदाच विक्रम 

शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पावसाने कहर केला. शनिवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने २४ तासांत यवतमाळ तालुक्यामध्ये २३६.२ मिमी, महागाव तालुक्यामध्ये २३१.१ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जिल्हावासीयांची दाणादाण उडाली. यवतमाळ शहरातही पहिल्यांदाच इतका विक्रमी पाऊस झाला. एकट्या यवतमाळ मंडळामध्ये ३०३ मिमी पाऊस कोसळल्याने वडगाव, वाघाडी, गिरिजानगर, गिरीनगर, तलावफैल, लोहारा, वाघापूर या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर उभी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या.

वाशिम : नद्यांनी गावांना वेढले  

जिल्ह्यात बेंबळा नदीचे पाणी लाडेगावात, तर कमळगंगा धरणाचे पाणी हिवरालाहे गावात शिरले. नागपूर हायवे रस्त्यावरील खेर्डा-कारंजा गावानजीक असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. हिंगणवाडी, अंबोडा, रामटेक, राहटी या गावाच्या चारही बाजूने बेंबळा नदी गेल्यामुळे गावाला पाण्याने वेढा घातला असून, शहराशी गावाचा संपर्क तुटला. मानोरा तालुक्यात पूस नदीच्या पाण्याने वटफळ-मेंद्रा या गावाला वेढा घातला. रुई, गोस्ता, वटफळ, मेंद्रा इंगलवाडी, आदी सात गावांतील शेती या पूस नदीच्या पाण्याने खरडून गेली. पूर परिस्थितीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. 

मराठवाडा : येथे रिमझिम 

हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे.

नांदेड : पैनगंगेने सोडले पात्र

दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस होत असून, संपलेल्या २४ तासांत माहूर मंडळामध्ये ३०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १३ मंडळात अतिवृष्टी झाली असून, पैनगंगा नदीला पूर आला आहे. अनेक भागात पैनगंगा पात्र सोडून वाहत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

दोन दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. माहूर मंडळामध्ये २४ तासात विक्रमी ३०५ मिमी पाऊस झाला आहे. किनवट शहरातील मोमीनपुरा वस्तीत पुराचे पाणी शिरले असून, ८० जणांचे उर्दू शाळेत स्थलांतर केले आहे. पुरात अडकलेल्या टाकळी गावातील दोन पुरुष व एक महिला या तिघांना एसडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

परभणी :  संततधार

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे.  येलदरी धरणामध्ये सुमारे ५८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील आठ दिवसांमध्ये या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय लोअर दुधना, पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण बंधारा आणि पूर्णा, गोदावरी, दुधना यासारख्या नद्यांच्या पाणी पातळीत किंचितशी वाढ झाली आहे.

लातूर : सूर्यदर्शन नाही 

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे चौथ्या दिवशीही सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी गुरुवारी रात्री जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पिकांबरोबरच शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतर भागात पाऊस नसल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही.

कोल्हापूर : बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यात सकाळी नऊपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, १३ नद्यांवरील ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी  ३६.५ फुटांवर आहे. 

सातारा : कोयनेत वाढला साठा

दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोयना धरणात केवळ एक टीएसटी पाणीसाठा वाढला. 

सोलापूर, पुणे, सांगली :

ओढ जिल्ह्यात पावसाची उघडीप; शिराळा तालुक्यात  सर्वाधिक पाऊस

रत्नागिरी : पुन्हा जोर वाढला

पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढली आहे. तोणदे गावातील शंकराच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा बसला. तसेच आजूबाजूच्या शेतांतही पाणी पसरले.

सिंधुदुर्ग : मुसळधार कायम

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम; जानवली, गडनदीच्या पाणीपातळीत वाढ, आचरा मार्गावर काही काळ पाणी, केटी-बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.

मुंबई : जोरधारा

मुंबईसह उपनगर, ठाणे, रायगड, पालघर येथे अतिवृष्टी झाली असून शनिवारीदेखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

जळगाव : सातपुड्यात ढगफुटी, वढोद्यात पाणी

सातपुडा डोंगरात शनिवारी दुपारी ढगफुटी झाली. यामुळे जोंधनखेडा धरणाचा कच्चा भराव वाहून गेला. वाहून आलेले हे पाणी मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावात शिरले. यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे आणि सुळे या गावातही पुराचे पाणी शिरले होते. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातपुडा डोंगररांगा आणि पायथ्याशी ढगफुटी झाली. डोंगरावर झालेल्या ढगफुटीमुळे गावानजीक असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडून वढोदा गावाच्या दिशेने वाहत येणाऱ्या नदीत मोठा पूर आला. दहा वर्षांनंतर इतका मोठा पूर आल्याचे बोलले जात आहे.

सहस्त्रकुंड धबधबा बंद

सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. पुराच्या स्थितीमुळे सहस्त्रकुंड धबधबा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 

अहमदनगर : पिके करपली 

निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्याप जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत अवघा १२१ मिलिमीटर पाऊस झाला असून, मागील वर्षी याच कालावधीत २०६ मिलिमीटर पाऊस झाला होता. केवळ ७२.५८ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. खरिपात ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टरवर पेरणी होते. मात्र, यंदा ४ लाख १९ हजार ५२० क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

नाशिक : ३८ टक्केच पाऊस

शनिवारी काही मोजके तालुके वगळता पावसाचा फारसा जोर नव्हता. आज मालेगाव शहर व तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २३४.९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे.

धुळे : ३४ मिमी पाऊस

धुळे शहरासह जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच थांबून थांबून पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या २४ तासांत शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद जिल्ह्यात विंचूर गावात (१९ मिमी) झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३५ टक्के पाऊस झाला आहे.

जळगाव : प्रथमच दमदार

जळगाव शहरात या हंगामातील सर्वाधिक म्हणजेच एकाच दिवसात ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नेहमी जून महिन्यात जिल्ह्यात १२३ मिमी सरासरी पाऊस होतो. यंदा मात्र केवळ ४५ मिमी पाऊस झाला होता. तर जुलै महिन्यात एकूण १८९ मिमी पाऊस होत असतो, २२ जुलैपर्यंत जळगाव जिल्ह्यात एकूण २५० मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात एकूण २०५ मिमी पाऊस झाला आहे.

नंदुरबार :  सर्वदूर पाऊस

सर्वदूर अखेर पावसाच्या धारा बसरल्या आहेत. शनिवारी सायंकाळपासून सर्व तालुक्यात पावसाने जोर धरल्याने नागरिकांच्या जिवात जीव आला आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊस