कुठे धाकधूक तर कुठे आशा...

By मनीषा म्हात्रे | Published: May 22, 2024 04:10 PM2024-05-22T16:10:23+5:302024-05-22T16:10:44+5:30

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले.

Where is fear and where is hope... | कुठे धाकधूक तर कुठे आशा...

कुठे धाकधूक तर कुठे आशा...

मुंबई : कुठे मतदार यादीत नाव नाही तर कुठे मतदान यंत्रच बंद असतानाही मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ५६.३७ टक्के मतदान झाले. गेल्या लोकसभेला ५७.१५ टक्के मतदान झाले होते. दुसरीकडे, दगडफेक, अवैध धंदे आणि नामकरणामुळे चर्चेत आलेल्या मानखुर्द शिवाजी नगरमधील वाढलेल्या टक्केवारीने कुठे धाकधूक तर कुठे विजयाची आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे चित्र आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. येथील मुलुंड, भांडुप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम), घाटकोपर (पूर्व) आणि मानखुर्द-शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक ६१.३३ टक्के, घाटकोपर पूर्वेकडे ५७.८५ टक्के मतदान तर घाटकोपर पश्चिममध्ये ५५.९० टक्के मतदान झाले. हे तिन्ही मतदारसंघ कोटेचा यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तिन्ही मतदारसंघात कोटेचा यांच्यासह भाजपचे तीन आमदार असल्याने त्यांची पकड अधिक आहे. गेल्या लोकसभेला अनुक्रमे ६३.६६, ६१.२७ आणि  ५५.८९ टक्के मतदान झाले होते तर कोकणी मराठी मतदार असलेल्या भांडुप ५८.५३ तर विक्रोळी ५४.४५ टक्के मतदान झाले. 

२०१९ मध्ये हाच आकडा ५८.९९ आणि ५७.३० टक्के होता. या भागात सेनेचे दोन आमदार असल्याने येथील मतांचा पाटील यांना फायदा होऊ शकतो. पाच मतदारसंघ दोन्ही उमेदवारांसाठी कमी-जास्त फरकाने बरोबरीने असले तरी यामध्ये मानखुर्द शिवाजी नगर येथील वाढलेले मतदान निर्णायक ठरणार आहे. ते पाटील यांच्या मतांमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. 

विधानसभानिहाय मतदान 
मतदारसंघ      २०१९    २०२४       
मुलुंड                  १,८०,७४५    १,७९,७४७    
विक्रोळी             १,२९,९६७    १,२९,७७७    
भांडुप                 १,६४,९७९    १,६३,८४१    
घाटकोपर (वेस्ट)    १,४८,५८०    १,५१,०३२    
घाटकोपर (ईस्ट)     १,४२,४९३    १,४१,४०५    
मानखुर्द शिवाजी नगर     १,४१,००१    १,५६,९५८    

२०१४ मध्ये या मतदारसंघात ४० टक्के तर २०१९ मध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ५०.४८ टक्के मतदान झाले. सुरुवातीपासून हा मतदारसंघ आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आला. 
मतदानाच्या दिवशी येथील अनेक केंद्रावर धीम्या गतीने मतदानाच्या तक्रारीबरोबरच एका ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला तरी देखील मतदार मोठ्या संख्येने उतरले. त्यामुळे येथील मतदान निर्णायक ठरणार आहे. या मतदानाच्या आकडेवारीमुळे मतदारांचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Where is fear and where is hope...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.