कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:45 PM2024-01-04T17:45:19+5:302024-01-04T17:47:16+5:30
प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीराम यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. दुसरीकडे आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्या पक्षासह सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचदरम्यान अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. तर, आमदार राम शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीत नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षात बसणं आवडत नाही. त्यांना ते पचत नाही. मानसिक रुग्णांवर आग्र्याला उपचार होतो, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना तेथे जायची गरज आहे. वेळ पडली तर आमदार रवी राणा त्यांना तिकीट पाठवतील, अशी खोचक टोलाही नवनीत राणा यांनी लगावला. तर, दुसरीकडे भाजपा आमदार राम शिंदे यांनीही आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात आंदोलन सुरु केले असून पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला. तसेच, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणीही केली. श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची त्यांची मानसिकता आहे. मात्र मतं गोळा करण्यासाठी ते हिंदू धर्माची चेष्टा करु शकत नाहीत. राम मंदिर बांधले गेले आहे ही वस्तुस्थिती 'घमंडी' आघाडीला पटलेली नाही, अशी टीका राम कदम यांनी केली.
कुठल्या मंदिरात मांसाहार चालतो? प्रसाद म्हणून कुठे मांसाहार चढवला जातो? जर देवतांना मांसाहार प्रिय असता, तर मांसाहार प्रसादात दिला असता. घरी साधी पूजा जरी असेल, तरी मांसाहार करणारं घर त्यादिवशी शाकाहार करतं, चार मित्र मंदिरात जात असतील, आणि एकाने मांसाहार केला असेल, तर तो देवळाबाहेर थांबतो, हे जितेंद्र आव्हाडांना चांगलं माहिती आहे. तरीदेखील हिंदूंच्या भावना दुखवायच्या आणि कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या भावना खुश करायच्या, यासाठी हे पेटी पॉलिटिक्स आहे, असा आरोप राम कदम यांनी केला.
वादानंतर आव्हाडांचं स्पष्टीकरण
प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.