मुंबई - सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेल्या रॅपरला संभाजीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती होती. त्यानंतर, अंबरनाथमध्ये या रॅपरविरुद्ध गुन्हा दाखल असल्याने त्यास अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते. मात्र, आपला मुलगा नेमकं कोणत्या पोलीस ठाण्यात आहे, कुठे आहे, अटकेत आहे की नाही, याबाबत कुटुंबीयांना कुठलीही माहिती नाही. त्यामुळे, राज मुंगासेचे आई-वडिल भयभीत झाले असून आमचा पोरंगा कुठं आहे, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केलीय. याबाबत, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन पोलिसांना प्रश्न विचारला आहे.
राज मुंगासे हा एक रॅपर असून त्याने बनवलेल्या “50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे शब्द असलेल्या असलेले रॅप साँग बनवले होते. या रॅपमुळे तो काही दिवसांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रॅपरचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अल्पवधीतच तो लोकप्रिय झाला. मात्र, या गाण्यातून शिंदे गटाची, आमदारांची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्यावतीने रॅपर राज मुंगासेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, त्याला तत्परता दाखवत अटक देखील करण्यात आली. संभाजी नगर पोलिसांनी राज मुंगासे यास अटक करून अंबरनाथ पोलिस स्टेशन च्या पोलिसांना हाती सोपवतील असे सूचक ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. मात्र, आता, आव्हाड यांनीच रॅपर राज मुंगासे नेमका आहे कुठे? असा सवाल विचारला आहे.
रॅपर राज मुंगासेचे गाणे ज्या दिवसापासून सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे.पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केले आहे.
आव्हाड यांनी ट्विटरमध्ये राज मुंगासेच्या भावाने पाठवलेला व्हॉट्अप मेसेजही शेअर केलाय. त्यामध्ये, कुटुंबीयांची भीती व्यक्त करण्यात आली आहे, तसेच पोलिसांना राजबद्दल विचारले असता टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचंही त्याच्या भावाने म्हटलं आहे.
दरम्यान, एखाद्या आरोपीला कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केल्यास त्यासंबंधीत माहिती संबंधित आरोपीच्या नातेवाईकांना देणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, येथे पोलिसांकडून ही माहिती राज मुंगासे यांच्या घरच्यांना देण्यात आलीच नाही, असा आरोप रॅपर राज मुंगासे यांचा भाऊ संतोष मुंगासे यांनी पाठवलेल्या मेसेजमधून केला आहे.