कुर्ला बेस्ट अपघाताचा चौकशी अहवाल अडला कुठे? २२ दिवस उलटले, दप्तर दिरंगाई कुणासाठी? संघटनांकडून संशय व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:49 IST2025-01-02T12:49:00+5:302025-01-02T12:49:26+5:30
कुर्ला पश्चिमेला बेस्ट बसला ९ डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात १० जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जखमी झाले.

कुर्ला बेस्ट अपघाताचा चौकशी अहवाल अडला कुठे? २२ दिवस उलटले, दप्तर दिरंगाई कुणासाठी? संघटनांकडून संशय व्यक्त
मुंबई : कुर्ल्यात झालेल्या बसच्या भीषण अपघाताबाबतचाबेस्ट उपक्रमाचा अहवाल २२ दिवसांनंतरही सादर झालेला नाही. त्यामुळे अपघातास जबाबदार कोण, हे गुलदस्त्यात आहे. अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्याने अहवाल नेमका कधी सादर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुर्ला पश्चिमेला बेस्ट बसला ९ डिसेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात १० जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीसाठी व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीत तांत्रिक आणि वाहतूक विभागातील चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश होता. अपघाताचे नेमके कारण, अपघातग्रस्त बसची स्थिती, चालकाचे प्रशिक्षण आदींबाबत ही समिती चौकशी करणार होती. ही समिती १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करील, असे तत्कालीन महाव्यवस्थापक डिग्गीकर यांनी अपघातानंतर सांगितले होते.
नवे महाव्यवस्थापक काय निर्णय घेणार?
बेस्ट महाव्यवस्थापकपदी अनिल डिग्गीकर यांच्या जागी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवे महाव्यवस्थापक बेस्टच्या कारभाराबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजपर्यंत बस अपघात प्रकरणांचे अहवाल तातडीने देणारा बेस्ट उपक्रम या अपघाताच्या बाबतीत दिरंगाई का करत आहे? या दप्तर दिरंगाईमागे कुणाला पाठीशी घालण्याचा हेतू तर नाही ना? बेस्टने स्पष्ट करावे.
- रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्यासाठी