Join us

जोगेश्वरीत कुठे आहे जोगेश्वरीचं मंदिर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 11:48 AM

पश्चिम रेल्वेवर एका स्टेशनला ‘जोगेश्वरी’ हे नाव देण्यात आलं, ते या भागातील जोगेश्वरी (योगेश्वरी) मंदिरामुळे. बाहेरच्या सोडा; पण असंख्य स्थानिक लोकांनाही जोगेश्वरीचं मंदिर कुठं आहे, कसं जायचं, हे माहीत नाही. शोधा म्हणजे सापडेल, असा प्रकार आहे.

संजीव साबडे, मुक्त पत्रकार

पश्चिम रेल्वेवर एका स्टेशनला ‘जोगेश्वरी’ हे नाव देण्यात आलं, ते या भागातील जोगेश्वरी (योगेश्वरी) मंदिरामुळे. बाहेरच्या सोडा; पण असंख्य स्थानिक लोकांनाही जोगेश्वरीचं मंदिर कुठं आहे, कसं जायचं, हे माहीत नाही. शोधा म्हणजे सापडेल, असा प्रकार आहे. 

अगदी २० वर्षांपूर्वीपर्यंत जोगेश्वरी स्टेशनवर दिवसा वा रात्रीही कधी गर्दी दिसायची नाही. दुपारी तर ते ओसाडच असे. रेल्वेने जाताना चपला-बूट बनवणारी करोना साहू कंपनी दिसायची. ती बंद झाली. आणखी दिसणारी महत्त्वाची कंपनी म्हणजे न्यू स्टँडर्ड इंजिनिअरिंग कंपनी. ती बंद होऊन त्या जागेवर एनएसई ग्राउंड व एक्झिबिशन सेंटर. 

रेल्वे क्रॉसिंग प्लॅटफॉर्मला लागून. पश्चिमेला स्टेशनसमोर पारशांचे काही बंगले, त्या शेजारी मेमन हायस्कूल, समोर अंध विद्यार्थ्यांची संस्था, दुसऱ्या बाजूला तबेले, उत्तर भारतीयांचं यादवनगर, पुढे काही चाळी, मुस्लिमांची वस्ती व व्यवसाय, राम व श्याम सिनेमा, पटेल इस्टेट. अंधेरीच्या आधी आंबोली गाव, गोरेगाव-राम मंदिरपूर्वी ओशिवरा आणि लाकडी भंगार व फर्निचरवाले. पूर्वेला तर समोर डोंगरावर इस्माईल युसूफ कॉलेज. बाजूचा एक रस्ता आंबोली फाटकाकडे जाणारा. दुसरा रस्ता हायवे, बांदेकरवाडी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर,) महाकाली गुंफा आणि इतर डोंगराळ वसाहतींकडे जाणारा.

>> जुन्या मंडळींना जोगेश्वरी देवीचं फार प्रेम. काहींनी तिला कुलदेवता केलं आहे. हे मंदिर आणि गुंफा वा लेणी यांचा परस्पर संबंध आहे. लेणी मुळात बौद्धकालीन. महायान बौद्ध स्थापत्याचा तो अखेरचा टप्पा आणि वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेचा सुरुवातीचा टप्पा. त्यावेळी तिथं हिंदू देव-देवता यांचं आगमन झालं.>> प्रतिष्ठापना केली म्हणू हवं तर. मोठा सभामंडप, सुरेख खांब व दगडातील कोरीव काम आणि पाण्याच्या दोन टाक्या अशी सारी उभारणी. त्यातच योगेश्वरीचं पाऊलही कोरण्यात आलं आहे. शिवाय देवींची आणि गणेश व शिव यांच्या मूर्ती दिसतात; पण हा सारा परिसर लोकवस्तीच्या आत अडकल्यासारखा झालाय.

>>  जेव्हीएलआरवर प्रतापनगरचा बसस्टॉप आहे. तिथूनही गुंफा, लेणी, मंदिर याकडे जाण्याचा रस्ता आहे. तो भाग मजास गावाचा. >>  जेव्हीएलआरमुळे संपूर्ण जोगेश्वरीचा प्रचंड विकास झाला. पवई, विक्रोळी जवळ आलं, महापालिकेचं मोठं ट्रॉमा सेंटर आलं; पण त्यात कमाल आमरोही यांचा कमालीस्तान स्टुडिओ मात्र दिसेनासा झाला. >> आता जोगेश्वरीच्या चाळी ही प्रामुख्याने मराठी मंडळीची वस्ती आहे. उत्तर भारतीयही आहेत असंख्य; पण वाढणाऱ्या उंच इमारतीत येत आहेत अमराठी उच्चभ्रू.

टॅग्स :मुंबई