मोनोचे घोडे अडलेय कुठे? , प्रतीक्षा दुस-या टप्प्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:25 AM2018-01-15T01:25:06+5:302018-01-15T01:25:11+5:30

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दुर्घटनेनंतर मोनोरेल अद्याप सुरू झालेली नाही. मोनोच्या पहिल्या टप्प्याची दुरुस्ती करून, १ जानेवारी २०१८ पर्यंत दुस-या टप्प्यातील मोनोरेलदेखील सुरू करण्यात येईल

Where mono horses are stacked? Waiting second phase | मोनोचे घोडे अडलेय कुठे? , प्रतीक्षा दुस-या टप्प्याची

मोनोचे घोडे अडलेय कुठे? , प्रतीक्षा दुस-या टप्प्याची

Next

अक्षय चोरगे 
मुंबई : मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दुर्घटनेनंतर मोनोरेल अद्याप सुरू झालेली नाही. मोनोच्या पहिल्या टप्प्याची दुरुस्ती करून, १ जानेवारी २०१८ पर्यंत दुस-या टप्प्यातील मोनोरेलदेखील सुरू करण्यात येईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून याबाबत काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत. परंतु आता या क्षणी मोनोच्या दुसºया टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, फेब्रुवारी महिन्यात मोनो रुळावर आणण्याचा निर्धार प्राधिकरणाने केला आहे.
एमएमआरडीएकडून फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा (८.९३ किलोमीटर - ७ स्थानके) हा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. त्यानंतर, डिसेंबर २०१५पर्यंत वडाळा ते जेकब सर्कल (११.२८ किलोमीटर - १० स्थानके) हा मोनोचा दुसरा टप्पादेखील सुरू करू, असे आश्वासन एमएमआरडीएने दिले होते, परंतु मुंबईकरांना अजूनही मोनोच्या दुसºया टप्प्याची प्रतीक्षा आहे. मोनोचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात, आगीच्या दुर्घटना, तसेच अन्य दुर्घटनांमुळे मोनोरेल प्रकल्प हा प्रशासनाचा अयशस्वी प्रकल्प असल्याचे वाहतूक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
या प्रकल्पाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून, मोनोची देखभालही योग्य पद्धतीने होत नाही, तिच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले जात नाही. परिणामी, मोनोरेल अडगळीत पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी मोनोरेलच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यायला हवे, तसेच लवकरात लवकर दुसरा टप्पा सुरू करायला हवा. मोनोचा दुसरा टप्पा हा मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे या भागात चाकरमान्यांची दररोजची ये-जा असते. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल,
अशी आशाही वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मोनोच्या पहिल्या टप्प्यातील स्थानके
चेंबूर
व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन
फर्टीलायझर टाउनशीप
भारत पेट्रोलियम
मैसूर कॉलनी
भक्ती पार्क
वडाळा डेपो

मोनोच्या दुसºया
टप्प्यातील
मोनोची स्थानके
गुरू तेग बहादुर नगर
अ‍ॅन्टॉप हिल
आचार्य अत्रे नगर
वडाळा ब्रिज
दादर
नायगाव
आंबेडकरनगर
मिंट कॉलनी
लोअर परळ
चिंचपोकळी
जेकब सर्कल

प्रवासी संख्या कमी :
१५० प्रवाशांची क्षमता असलेल्या मानोरेलमध्ये दुपारच्या वेळेत १५ ते २० प्रवासी असतात. सायंकाळी ही संख्या ७० ते ८० होते. त्यामुळे जास्तीतजास्त प्रवाशांनी मोनोचा वापर करावा, यासाठी दुसरा टप्पा सुरू होणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या परिसरातून पुढे जातो. त्यामुळे तो पूर्ण झाल्यानंतर मोनोचा मोठ्या प्रमाणात वापर होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दुसरा टप्पा प्रलंबित :
२०१४ साली मोनोरेलचा चेंबूर ते वडळा असा पहिला टप्पा सुरू झाला. तो सुरू झाल्यानंतर डिसेंबर २०१५ पर्यंत वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पा सुरू करू, असे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले होते. त्यानंतर, मे २०१६, डिसेंबर २०१६, अशा तारखा जाहीर करण्यात आल्या. मात्र, साडेतीन वर्षे उलटूनही दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे दुसºया टप्प्याला विलंब होत असल्याचे अनेक वेळा एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते.

प्रवाशांची गैरसोय : दोन महिन्यांपासून मोनोरेल बंद असल्याने, चेंबूर ते वडाळा परिसरातील मोनोरेलच्या प्रवाशांची गैरसोय होत असून, येथील वाहतुकीवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. मोनोरेल प्रकल्प सुरक्षित नाही, तिची देखभाल करण्यात प्रशासन अपुरे पडत आहे, मोनोरेलचे अंतर खूपच कमी आहे, अशा विविध कारणांमुळे मोनोचा वापर कमी होतो. अशा प्रतिक्रिया वाहतूक तज्ज्ञांनी दिल्या.

फेबु्रवारी २०१४ मध्ये सुरू झालेल्या मोनोरेलची प्रवासी संख्या जेमतेम १६ ते १८ हजार आहे. त्याउलट मोनोनंतर ४ महिन्यांनी सुरू झालेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोचा दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी वापर करतात.

बंद असलेल्या मोनोमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे दर दिवशी ३ लाख रुपये बुडतात. मोनोमुळे प्रशासनाचे आतापर्यंत ५० कोटींहून अधिक नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Where mono horses are stacked? Waiting second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.