ख्रिसमसच्या सुट्टीत कुठे ? दुबई, श्रीलंका की केरळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 08:05 AM2023-12-10T08:05:02+5:302023-12-10T08:05:29+5:30

नवनवीन ठिकाणांना भेटी देणे, फिरणे हे मानवी स्वभावात उपजतच असते. मात्र, प्रत्येक वेळी तुम्हाला फिरायला मिळतेच असे नाही. म्हणून मग सुट्टीचा पर्याय असतो. सुट्ट्या मिळाल्या की फिरायला जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते. ख्रिसमसची सुट्टीही त्यास अपवाद नाही.

Where on Christmas vacation? Dubai, Sri Lanka or Kerala? | ख्रिसमसच्या सुट्टीत कुठे ? दुबई, श्रीलंका की केरळ?

ख्रिसमसच्या सुट्टीत कुठे ? दुबई, श्रीलंका की केरळ?

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

आपल्या खंडप्राय देशात एवढी विविधता आहे की, अमक्या एका ठिकाणी फिरायला जाण्यावर घरातील सगळ्यांचे एकमत होईलच असे नाही. तरीही सलग सुट्ट्यांची चाहूल लागली की फिरायला जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते. विमानाने जायचे की रेल्वेने वगैरे ठरवून पॅकिंग केले जाते. यंदाच्या नाताळात कोणी कोणत्या पर्यटनस्थळाला पसंती दिली आहे, पाहू या...

गोवा

बहुतेकांच्या यादीत गोवा हे अग्रस्थानी असते. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला अधिक पसंती न मिळती तरच नवल ! यंदाचा नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत गोव्याच्या किनाऱ्यांवर करण्याचे अनेकांचे नियोजन आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी

सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य पुतळ्याचे आकर्षण सर्वांना आहे. गुजरातमधील सरदार सरोवराजवळ उभारण्यात आलेला हा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जाण्याचे बहुतेकांचे मनसुबे असतात. यंदा ख्रिसमसला स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी अनेकांनी पसंती दिली आहे.

कच्छचे रण

गुजरातमधील कच्छचे रण हे आणखी एक पर्यटकांचे आवडते स्थळ. अनेक पर्यटकांनी या ठिकाणाला पसंती दिली असून तेथील बुकिंग आताच फुल्ल झाल्याची माहिती एंटरप्रायझिंग ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे सदस्य अभिजित खाडिलकर यांनी दिली.

तारकर्ली आणि मालवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्यामुळे आगामी काळात मालवण येथे पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

परदेशी स्थळांनाही प्राधान्य

केवळ देशांतर्गतच नव्हे तर अनेकांनी छोटी परदेश टूरही आयोजित केली आहे. त्यात दुबई, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांना अधिक पसंती आहे. या तीनही देशांमधील टूर आर्थिकदृष्ट्याही परवडणारी असल्याने अनेकजण परदेशात जाताना या तीन ठिकाणांना प्राधान्य देतात, असे अभिजित खाडिलकर यांनी सांगितले.

केरळ

देवभूमी केरळला जाण्यासाठी अनेकजण उत्सुक आहे. त्रिवेंद्रम, कोची, एर्नाकुलम आणि तिकडून कन्याकुमारी असा बहुतेकांचा रूट ठरला आहे. मान्सूनचे आगमन जिथून होते ते भारताचे अखेरचे टोक पाहण्यासाठीही अनेकजणांनी पसंती दिल्याचे एका ट्रॅव्हल बुकिंग एजंटने सांगितले.

याशिवाय हिमाचल, जम्मू-काश्मीर, अमृतसर, राजस्थान, उटी, गोकर्ण, मुरुडेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणांनाही अनेकांनी पसंती दिली आहे. थंडीच्या मोसमात या ठिकाणांना आवर्जून भेट देण्याकडे पर्यटकांचा कल असतो. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे तिथली गर्दी वाढेल, असा अंदाज आहे.

Web Title: Where on Christmas vacation? Dubai, Sri Lanka or Kerala?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.