मुंबई : मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी संचालक डॉ. नीरज हातेकर यांच्या विरोधातील वाङमयचौर्याच्या तक्रारीवर चौकशी समितीने २९ जानेवारीला कुलगुरुंना अहवाल सादर केला. मात्र एक महिन्यानंतरही तो राज्यपाल सचिवालयाला मिळालेला नाही. त्यामुळे हा अहवाल नेमका अडकला कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर डॉ. हातेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समितीवरच आक्षेप नोंदविले आणि नव्याने चौकशीची मागणी केली.डॉ. हातेकर यांच्या पीएच.डी.च्या संदर्भात वाङमयचौर्याची तक्रार एका व्याख्यातीने राज्यपाल सचिवालयाकडे केली. त्यानंतर सचिवालयाच्या निर्देशानुसार डॉ. आर. के. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन झाली. समितीसमोर तक्रारदार व्याख्याती, डॉ. नीरज हातेकर व प्रा. रजनी माथूर हजर झाले. त्यांनी बाजू मांडली. समितीने २९ जानेवारीला कुलगुरुंना अहवाल सादर केला. तो तातडीने राजभवनला पाठविणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले होते, अशी माहिती डॉ. चौहान यांनी लोकमतला दिली. सोमवारी लोकमतने डॉ. शिंदे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दिवसभर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठात विविध बैठकांमध्ये होते.चौकशी अहवाल अजून मिळाला नसल्याचे राज्यपाल सचिवालयाने सांगितले. त्यामुळे याप्रकरणी विद्यापीठावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.समिती मान्य नसताना हातेकर हजर का झाले?वाङमयचौर्य केल्याच्या आरोपांची याआधी करण्यात आलेली चौकशी सुयोग्य पद्धतीने झालेली नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठाने आधी चौकशीची विधिसंमत प्रक्रिया निश्चित करावी. त्यानंतर आरोपांची नव्याने चौकशी करावी, अशी मागणी हातेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.विद्यापीठाने नेमलेल्या समितीपुढे लेखी उत्तर सादर करण्यासह आपली बाजू मांडल्यानंतर आता प्रा. हातेकर यांनी समितीच्या कामकाज पद्धतीस आक्षेप घेतला आहे. मात्र समिती मान्य नसताना ते हजर का झाले, असा सवाल केला जात आहे.वाङमयचौर्यावर नियमावली ठरविण्यासाठी मी कुलगुरुंशी चर्चा केली. माझ्या म्हणण्याला त्यांनी सहमतीही दर्शविली. त्यांनी पुढे काहीच का केले नाही, हे अनाकलनीय आहे.- प्रा. डॉ. नीरज हातेकर
वाङ्मयचौर्याचा अहवाल अडकला कुठे? नीरज हातेकरांना हवी पुन्हा चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 5:28 AM