मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला हळू हळू अनलॉक करण्यात येत आहे. देशातील बहुतांश रेल्वेसेवा सुरू करण्यात आली असून राज्यातील बससेवाही पूर्णपणे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे, आता लोकल कधी सुरू होईल, असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू असलेल्या लोकल रेल्वेची गर्दी पाहून सोशल डिस्टन्सचं काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील एका आयएएस अधिकाऱ्यानं मुंबईतील लोकल गर्दीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
तोंडावर मास्क, खिशात सॅनिटायजरची बाटली आणि कोरोनाची चर्चा तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, सोशल डिस्टन्सचा मुद्दा गंभीरच होत चालला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सचा अभाव दिसून येत आहे. तर, बससेवा आणि लोकल रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. बोरीवली स्टेशनवरील लोकल रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आयएएस अधिकारी अवानिश शरन यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडालय हे दाखवण्याचं काम सोशल मीडियातून होत आहे. तसेच, ज्या मुंबईत आणि महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. त्याच महाराष्ट्रातील मुंबईत अशाप्रकारे गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, वेस्टर्न रेल्वेने या व्हिडिओतील गर्दीचे कारण सांगितले आहे. 23 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. याच कारणामुळे या लोकल रेल्वेत ही गर्दी झाल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान, गेल्या 6 महिन्यांपासून मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. वर्क फ्रॉम होम सुविधेतून काम करणाऱ्यांना याचा काहीही फटका नाही. मात्र, ज्यांचा रोजगार बुडालाय, गेल्या 6 महिन्यांपासून काम नाही, त्या सर्वसामान्य लोकांना या गर्दीतूनच प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही अनेकांनी म्हटलंय.