मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत असून, वाहन उभे करण्यासाठी आता बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोखालच्या जागांचाही वापर करण्यात येत आहे. मेट्रो मार्ग ९ म्हणजेच दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रोच्या बांधकामाखालीही बेकायदेशीर वाहनतळासाठी कब्जा केला जात असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत संबंधितांवर कारवाई केली जात आहे.
शिवाय आता तर काशिमीरा पोलिस ठाण्यासह वाहतूक विभागाला या प्रकरणी पत्र देण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो शाखेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून अंकुश कुराडे यांना कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. कुराडे यांनी या प्रकरणी प्राधिकरणाकडे तक्रार दिली होती.
१) काही लोक बेकायदेशीररीत्या वाहने पार्क करीत आहेत. काही बेघर लोक बॅरिकेड्सच्या मध्ये जाऊन रात्री वास्तव्य करीत आहेत.
२) वारंवार त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे. तरी पुन्हा मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी दाखल होत वास्तव्य करीत आहेत.
३) प्राधिकरणामार्फत नेमण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत अनधिकृतरीत्या लावण्यात आलेली वाहने त्वरित काढली जात आहेत.
४) जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला मेट्रो ९ म्हणजे दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर व मेट्रो ७ अ म्हणजे अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम देण्यात आले आहे.
५) मेट्रो कामाच्या देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामान्य सल्लागार संघाची नियुक्ती केली आहे.
६) वाहतुकीला अडथळा होऊ नये, म्हणून एका बाजूने बॅरिकेड्स लावून गोल्डन नेस्ट सर्कलपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे बॅरिकेड्स काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर -
१) मेट्रो मार्गाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.
२) जिथे काम पूर्ण झाले आहे, तिथे प्राधिकरणामार्फत रस्ता दुभाजक लावत त्यांच्यामध्ये झाडे लावून सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
३) मेदतीयानगर या मेट्रो स्थानकाखाली मेट्रो व फ्लायओव्हरचे एकत्र काम सुरू आहे.
४) काही ठिकाणी सुशोभीकरणाचे काम बाकी आहे.