मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईची अवस्था बिकट झालेली आहे. दरम्यान, मुंबई कोरोनाविरोधात लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवरून शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहे. मनसेने कोरोनाबाधित मृतदेहांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला असून, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाई यांना मनसेकडून लक्ष्य केले आहे. त्यावरून वरुण सरदेसाई यांनी संदीप देशपांडेना मानहानीची नोटीस पाठवल्याने मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. तसेच मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून सरदेसाईंवर बोचरी टीका केली आहे.
महानगरपालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा, असा कारभार सुरू आहे. मढ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश आम्ही करणारच, पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण हा वरुण सरदेसाई, हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणारा, उलट संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत त्यांनीच २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे, आहे हिंमत उत्तर द्यायची? असे प्रतिआव्हान मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी वरुण सरदेसाईंना दिले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाधितांच्या मृतदेहांसाठी वापरण्यात येत असलेल्या बॅगमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यात ते म्हणाले होते की , कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून मुंबई महानगरपालिका, मास्क, पीपीई किट खरेदी करत आहे, त्या खरेदीवर आमचे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने मृतदेहांसाठीच्या बॅग खरेदी केल्या. त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला. या बॅगची किंमत काय ती पालिकेने ठरवावी, पण कमी गुणवत्तेच्या बॅग खरेदी करून मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नये.
इतर महत्त्वाच्या बातम्या