जिकडे सत्ता तिकडे अपक्ष, आघाडीकडून पुन्हा युतीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:41 AM2019-09-11T03:41:50+5:302019-09-11T03:42:01+5:30
सत्तातुर : १९९५ च्या युती सरकारचे तारणहार पुन्हा युतीत
पोपट पवार
कोल्हापूर : १९९५ मध्ये शिवसेना-भाजपच्या अल्पमतातील युती सरकारला अपक्षांची जुळवा-जुळव करून सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या ७ अपक्ष आमदारांना राज्यमंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली होती. पुढे सत्तापालटात काँग्रेस-राष्ट्रवादी असा प्रवास करणाºया याच आमदारांनी राजकीय हवेचा अंदाज घेत दोन तपानंतर युतीच्या वाटेवर मार्गक्रमण सुरु केले आहे. यातील काहींनी या अगोदरच युतीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तर, काहीजण युतीच्या उंबरठ्यावर आहेत.
१९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीला १३८ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ८० जागांवर समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे कधी नव्हे ते अपक्षांनीही चांगलाच भाव खात ४५ जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे युतीला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काही आमदारांची गरज असताना अपक्षांनी मदतीचा हात पुढे करत मंत्रिपदे पदरात पाडून घेतली होती. अपक्षांची मोट बांधणाºया ७ अपक्ष आमदारांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. यात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, गेवराईचे बदामराव पंडित, करमाळ्याचे स्व. दिगंबर बागल, बार्शीचे दिलीप सोपल, शिराळ्याचे शिवाजीराव नाईक, चंदगडचे भरमूअण्णा पाटील यांचा समावेश होता. १९९९ मध्ये युतीचे सरकार गेल्यानंतर यातील बहुतांश नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत उडी घेत सत्ताकेंद्रे मिळवली होती. आता पुन्हा बदलत्या हवेचा अंदाज घेत युतीच्या या तारणहारांनी शिवसेना-भाजपची पताका खांद्यावर घेण्याची तयारी चालविली आहे. युती सरकारच्या काळात राज्यमंत्री तर आघाडी सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्रिपद पटकावणाºया हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा युतीचा लळा लागला असून, ते उद्या भाजपमध्ये जाणार आहेत. युतीत राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागलेले बार्शीचे दिलीप सोपल आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. मात्र, त्यांनीही शिवबंधन बांधत जुन्या मित्रांत रमणे पसंत केले आहे. गेवराईचे बदामराव पंडित यांनी युती सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. पुढे २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून आमदार झालेल्या बदामरावांनी सध्या शिवेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, भरमूअण्णा पाटील यांनी याआधीच भाजपची संगत केली आहे. करमाळ्यच्या स्व. दिगंबर बागल यांच्या कुटुंबानेही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
रामराजे कुंपणावर...
१९९५ मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी युती सरकारला प. महाराष्ट्रातील अपक्षांचे पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे याच सरकारच्या काळात स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. पुढे आघाडीच्या काळात रामराजेंनी शरद पवारांची सोबत केल्याने त्यांना मानाचे पान देण्यात आले. मात्र, नव्या राजकीय धांडोळ्यात रामराजेही युतीच्या कुंपणावर असल्याचे चित्र आहे.
मोहिते-पाटलांच्या घरातही मिळाले होते मंत्रिपद...
सध्या अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी या परिवाराचे भाजपबरोबरचे संबंध नवे नाहीत. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे लहान बंधू स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करत सहकार राज्यमंत्रिपद पटकावले होते.
1995 ला सर्वाधिक अपक्ष आमदार...
१९६२ पासून आतापर्यंत झालेल्या राज्याच्या १२ विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक ४५ अपक्ष १९९५ मध्ये निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांनीच किंगमेकरची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे २०१४ मध्ये सर्वाधिक कमी केवळ ७ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. १९६२ च्या निवडणुकीत १५ अपक्षांनी विधानसभा गाठली होती.